चर्चेत राहण्यासाठीही पटोलेंना मोदीजींचंच नाव घ्यावं लागतं! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला

    01-Jul-2025   
Total Views |


मुंबई : नाना पटोलेंनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. पण चर्चेत राहण्यासाठीसुद्धा त्यांना मोदीजींचेच नाव घ्यावे लागते. कारण बाप बाप होता है, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. मंगळवार, १ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "नाना पटोले हे स्वत: विधानसभेचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांना सगळे नियम आणि कामकाज माहिती आहे. विधानसभेच्या सभागृहाची गरीमा आणि पावित्र्य राखले पाहिजे, हेसुद्धा त्यांना माहिती आहे. परंतू, ते आज का व्यथित झाले ते माहिती नाही. थेट अध्यक्षांच्या आसनाकडे जाऊन त्यांनी राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. नानांकडून या कृतीची अपेक्षा नव्हती. बरेच दिवस दिल्लीत किंवा काँग्रेसमध्ये त्यांच्या नावाची चर्चा दिसत नव्हती. त्यामुळे आपले नाव चर्चेत आणि प्रकाशात यावे, यासाठी हा प्रयत्न आहे का? परंतू, त्यासाठीदेखील त्यांना मोदीजींचेच नाव घ्यावे लागते. कारण बाप बाप होता है. त्यामुळे विधानसभा में जनता ने दिये उनको झटके और काँग्रेस सोला पे अटके, एवढेच मी सांगेन. यातून त्यांनी बोध घेतला पाहिजे," असे ते म्हणाले.


ते पुढे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राला मदत केली. महाराष्ट्रातील विकासासाठी पैसे दिले, शेतकऱ्यांसाठी योजना दिल्या. त्यामुळेच महायूतीला हा जनादेश मिळाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करणे हे नियमाला आणि परंपरेला धरून नाही. त्यांचा आदर आणि सन्मान केला पाहिजे. काँग्रेसचे राहुल गांधी देशाच्या बाहेर जाऊन देशाची आणि पंतप्रधान मोदीजींची बदनामी करतात. त्यामुळे ते चर्चेत येतात. आता नाना पटोलेंनीदेखील पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे," असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....