आवाज मराठीचा! वाजत गाजत या, आम्ही वाट बघतोय; ठाकरे बंधूंची निमंत्रण पत्रिका व्हायरल

01 Jul 2025 17:31:23

मुंबई : राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी येत्या ५ जुलै रोजी विजयी रॅलीचे आयोजन केले आहे. दरम्यान, आता या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका व्हायरल झाली आहे. आवाज मराठीचा, वाजत गाजत या, आम्ही वाट बघतोय, असे या पत्रिकेत म्हटले आहे.

येत्या ५ जुलै रोजी ठाकरे बंधूंनी पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्रित मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. राज्य सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंनी विजयी मेळावा आयोजित केला आहे. वरळीतील डोम सभागृहात सकाळी १० वाजता हा विजयी मेळावा होणार आहे.

निमंत्रण पत्रिकेत काय?
आवाज मराठीचा! मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं…! कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या !! आम्ही वाट बघतोय…! आपले नम्र, राज ठाकरे – उद्धव ठाकरे," असे या निमंत्रण पत्रिकेत म्हटले आहे.





Powered By Sangraha 9.0