‘मना’चे श्लोक’मधून नात्यांची गुंतागुंत उलगडणार; पोस्टरनं वाढवली उत्सुकता!

01 Jul 2025 19:05:17
the complexity of relationships will be revealed in manache shlok


मुंबई :  मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘मना’चे श्लोक’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून मृण्मयी देशपांडे सहा नायकांसोबत दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत होती. आता अखेर या चर्चेला पूर्णविराम देत नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.


या चित्रपटाचे पोस्टर पाहून ‘मना’चा श्लोक कोण आहे, याचा अंदाज येतोय. दोघांच्या चेहऱ्यावरील हावभाव खूप काही सांगत आहेत. आता दोघांचं नातं नक्की काय आहे? लग्न, नातं यांबद्दल त्यांचे विचार काय आहेत, का मतभेद आहेत, हे पाहायला आता प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. चित्रपटात मृण्मयी आणि राहुलसोबत पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब हे कलाकारही झळकणार आहेत.


चित्रपटाची दिग्दर्शक मृण्मयी देशपांडे सांगते, "‘मना’चे श्लोक’ ही गोष्ट आहे मनवा आणि श्लोक या दोघांची. त्यांच्या नात्यातून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या असण्यातून, त्यांची आयुष्याबद्दलची मतं, वेगवेगळे विचार हे सगळ्यांना ओळखीचे वाटतील. लग्नासारख्या विषयावर प्रत्येकाचं काही ना काही मत असतं. कुणाचं ठाम, कुणाचं गोंधळलेलं. या गोष्टी अनेकांनी अनुभवलेल्या असतील तर कोणी अनुभवेल. मी आताच सांगणार नाही की, चित्रपट कोणत्या वळणावर जाईल, परंतु मला खात्री आहे की प्रेक्षक मनातल्या मनात हसतील आणि म्हणतील, ‘हे तर अगदी माझ्यासारखं आहे!’ म्हणूनच हे ‘मना’चे श्लोक म्हणजे तुमच्याच मनातले विचार आहेत.’"


चित्रपटाचे निर्माते संजय दावरा म्हणतात, "मराठीत पहिल्यांदाच पाऊल टाकतोय. ‘मना’चे श्लोक’सारख्या संकल्पनेतून सुरुवात होणं माझ्यासाठी खास आहे." सह-निर्माते श्रेयश जाधव सांगतात, "हा चित्रपट एक वेगळी झलक घेऊन येतोय. मृण्मयीचं दिग्दर्शन आणि ती ज्या पद्धतीने गोष्टी टिपते, त्यातून प्रेक्षक नक्की रिलेट होतील." गणराज स्टुडिओ आणि संजय दावरा एक्सपरिअन्स निर्मित, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मना’चे श्लोक’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले असून, हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.




Powered By Sangraha 9.0