तेलंगणा केमिकल फॅक्टरी दुर्घटनेतील मृतांचा आकडा ४२ वर! बचावकार्य अद्याप सुरू

    01-Jul-2025   
Total Views |

हैदराबाद : (Telangana Chemical Factory Blast) तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील पशमैलाराम येथील औद्योगिक वसाहतीतल्या सिगाची केमिकल कंपनीत सोमवारी ३० जूनला झालेल्या रिॲक्टर स्फोटाच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या ४२ वर पोहोचली आहे. सोमवारी रात्रीपर्यंत १२ जणांचा मृतांचा आकडा मंगळवारी सकाळी ३४ वर पोहोचला आणि आता तो आणखी वाढला आहे. "ढिगाऱ्याखाली अनेक मृतदेह सापडले आहेत. बचावकार्याचा शेवटचा टप्पा अजूनही सुरू आहे," असे जिल्हा पोलिस अधीक्षक परितोष पंकज यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

हे वाचलंत का? "१५० हून अधिक काँग्रेस खासदार सोव्हिएत रशियाचे एजंट..." CIAच्या हवाल्याने निशिकांत दुबे यांचा धक्कादायक गौप्यस्फोट!


तेलंगणाचे आरोग्यमंत्री दामोदर राजनरसिंहा पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, "घटनेच्या वेळी कारखान्यात सुमारे ९० कर्मचारी होते. स्फोटामुळे औद्योगिक शेड पूर्णपणे उडून गेला आणि स्फोटाची तीव्रता इतकी तीव्र होती की काही कामगार हवेत उडाले आणि ते सुमारे १०० मीटर अंतरावर पडले," असे कामगारांच्या हवाल्याने त्यांनी पुढे सांगितले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या भीषण दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून अपघातात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आणि जखमींना चांगल्या वैद्यकीय उपचारांची सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, रेवंत रेड्डी मंगळवारी सकाळी अपघातस्थळाला भेट देणार असल्याचे बोलले जात आहे.

पंतप्रधानांनी जाहीर केली आर्थिक मदत

तेलंगणामधील घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. पीएमओने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत लिहिले की, "तेलंगणातील संगारेड्डी येथील कारखान्यातील आगीच्या घटनेत झालेल्या मृत्यूंमुळे मला दुःख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल मी शोक व्यक्त करतो. जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृतांच्या कुटुंबियाना २ लाख रुपये मदत दिली जाईल. तर जखमींना ५०,००० रुपये दिले जातील."

या भीषण स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, रासायनिक अभिक्रियेमुळे हा स्फोट झाल्याचा संशय आहे. मंगळवारी, स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एनडीआरएफ, हायड्रा आणि तेलंगणा अग्निशमन आपत्ती प्रतिसाद पथकांकडून बचाव कार्य अद्याप सुरू आहे.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\