राष्ट्रीय जनता दलाचे धोरण म्हणजे नमाजवाद – भाजपची टिका

01 Jul 2025 19:16:37

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेत तेजस्वी यादव यांना लक्ष्य करत त्यांना ‘मौलाना तेजस्वी’ म्हटले. तेजस्वी यादव स्वतःला समाजवादी म्हणतात, परंतु प्रत्यक्षात ते नमाजवादी असल्याची टिका त्यांनी पत्रकारपरिषदेत केली.

वक्फ कायद्यास विरोध करण्याची भूमिका राजदने स्पष्ट केली असून बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये राजदतर्फे या मुद्द्यास केंद्रस्थानी ठेवले जाणार असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकारपरिषदेत टिका केली. ते म्हणाले, इंडी आघाडीचे लोक पंतप्रधान मोदी यांच्या वंचित, दलित आणि महिलांच्या सक्षमीकऱणाचे विरोधक असून ते केवळ एकाच समुदायास सत्ता देऊ इच्छितात. भाजप संविधानाबद्दल बोलतो, तर हे लोक शरीयतबद्दल बोलतात संसदेने मंजूर केलेला वक्फ दुरुस्ती कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देण्याची भाषा इंडी आघाडीने केली आहे, त्यावरून त्यांचा मनसुबा लक्षात असल्याचे भाटिया म्हणाले.

गौरव भाटिया यांनी तेजस्वी यादव यांच्यावर टिकास्त्र सोडले. ते म्हणाले, देशाची संसद आणि राष्ट्रपतींनी मंजूर केलेला कायदा एखाद्या राज्याचे सरकार नाकारू शकते का, असा सवाल त्यांनी विचारला. तेजस्वी यादव केवळ लांगुलचालनाचे राजकारण करत असून ते नमाजवादाचे पाईक असल्याचीही टिका यावेळी त्यांनी केली.
Powered By Sangraha 9.0