मुंबई : रायगड किल्ला आज 'छत्र निजामपूर ग्रामपंचायत' या नावाने ओळखला जात असून ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे 'छत्र निजामपूर' हे नाव बदलून 'किल्ले रायगड ग्रामपंचायत' असे करण्याची अधिकृत मागणी करणारे निवेदन आ. गोपीचंद पडळकर यांनी मंगळवार, १ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केले.
गोपीचंद पडळकर या निवेदनात म्हणाले की, "ज्या रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी स्थापन केली, तो रायगड किल्ला आज छत्र निजामपूर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येतो, ही एक दुर्दैवाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जागतिक स्तरावर आदराने घेतले जाते. परंतू, त्यांच्या राजधानीच्या किल्ल्याची ग्रामपंचायत आजही 'छत्र निजामपूर' या नावाने ओळखली जाते, हे अत्यंत अनुचित आहे."
ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात अनेक ऐतिहासिक वाडे
या छत्र निजामपूर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात रायगडवाडी, वाघेरी, हिरकणवाडी, नेवाळीवाडी, खडकेवाडी, परडीवाडी, कोळीआवाड, शिंदेआवाड, टकमकवाडी, शिंदेकोण, पेरूचादांड आदिवासीवाडी, वाघेरीतील दुसरी आदिवासीवाडी आणि चाळकेकोण या ऐतिहासिक वाड्यांचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीचे कार्यालय सध्या निजामपूर या ठिकाणी असून प्रत्यक्षात रायगड किल्ल्याजवळील रायगडवाडी हेच केंद्रस्थानी आहे.
त्यामुळे छत्र निजामपूर ग्रामपंचायतीचे नाव बदलून 'किल्ले रायगड ग्रामपंचायत' असे करावे, जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीसाठी सुसंगत, गौरवशाली आणि ऐतिहासिक नामकरण होईल. ग्रामपंचायतीचे मुख्यालय रायगडवाडी इथेच स्थापन करावे. काळ जलविद्युत प्रकल्पाचे ७०% काम पूर्ण झाले असून त्यामध्ये निजामपूर गाव समाविष्ट होत आहे. त्यामुळे भविष्यात हे गाव अस्तित्वात राहणार नाही, हे लक्षात घेता प्रशासनिक पुनर्रचनेच्या दृष्टीने नावबदल अत्यावश्यक ठरते. ही मागणी केवळ भावनिक नव्हे, तर ऐतिहासिक गरज, प्रशासनिक सुसूत्रता आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये योग्य ती कार्यवाही तातडीने करावी," अशी विनंती गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
"छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला. त्यांनी अनेक वर्षे तिथे वास्तव्य केले. जिजामातांचा महाल तिथे आहे. त्या ग्रामपंचायतीचे नाव छत्र निजामपूर असे असणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. रायगडाच्या पायथ्याशी निजाम आला कुठून? निजामाचा संबंध काय? आम्हाला निजाम, आदिलशाही, औरंगजेब, अफजलखान, शाहिस्तेखान आणि मोगलांच्या कुठल्याच पाऊलखुणा नको आहेत. त्यामुळे हे नाव बदलून किल्ले रायगड ग्रामपंचायत असे या ग्रामपंचायतीचे नामकरण करावे. तसेच छत्र निजामपूरमध्ये असलेले या ग्रामपंचायतीचे कार्यालय रायगडवाडीमध्ये करावे, अशी आमची मागणी आहे."