विद्यार्थिनीवरील अत्याचार पूर्वनियोजित, कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणी एसआयटीचा खुलासा!
01 Jul 2025 13:42:52
कोलकाता : (Kolkata) कोलकात्यातील लॉ कॉलेजमधील विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली अटक केलेल्या चारपैकी तीन आरोपींनी हल्ल्याची पूर्वनियोजित योजना आखली होती, असे पीटीआयने एका पोलिस अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले. दरम्यान, या प्रकरणी तातडीने न्यायालयीन हस्तक्षेप आणि सीबीआय चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलाने दाखल केली आहे.
दरम्यान एसआयटीकडून या प्रकरणाची तपास सुरु आहे. आरोपी मनोजित मिश्रा, प्रमित मुखर्जी आणि जैद अहमद या तिघांवर यापूर्वी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचे नऊ सदस्यांच्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अधिकाऱ्यांना आढळून आले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींनी त्यांच्याकडील मोबाइलमध्ये अत्याचाराचे चित्रीकरण केले होते. नंतर ते त्या विद्यार्थिनींना त्रास देण्यासाठी या चित्रीकरणाचा वापर करायचे. एसआयटीच्या तपासात ही घटना पूर्वनियोजित असल्याचे उघड झाले आहे. "हे संपूर्ण प्रकरण पूर्वनियोजित होते. पीडितेवर हा अत्याचार करण्यासाठी हे तिन्ही आरोपी अनेक दिवसांपासून कट रचत होते. मुख्य आरोपी पीडितेला महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच तिला त्रास देत होता", असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी मोनोजित मिश्रा हा एक गुन्हेगार आहे आणि त्याच्याविरुद्ध लैंगिक छळ आणि हिंसक गुन्ह्यांचे अनेक खटले प्रलंबित आहेत, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने आरोपी मनोजित मिश्राची महाविद्यालयात एडी-एचओसी शिक्षक म्हणून झालेली कंत्राटी नियुक्ती रद्द केली आहे.