कावड यात्रेकरूंच्या घटनात्मक हक्कांचे रक्षण करणे गरजेचे : डॉ. सुरेंद्र जैन

01 Jul 2025 21:01:24

मुंबई  : "राष्ट्रीय एकता, सौहार्द आणि अखंडतेचे प्रतीक असलेल्या कावड यात्रेचे सर्व पंथ आणि धर्माच्या लोकांनी केवळ खुल्या मनाने स्वागत केले पाहिजे. त्याचबरोबर कावड यात्रेकरूंच्या घटनात्मक हक्कांचेही रक्षण केले पाहिजे", असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी केले.

या संबंधित एक व्हिडिओ पोस्ट करत ते म्हणाले की, कावड यात्रा अनादी काळापासून सुरू आहे. दरवर्षी सुमारे ८ कोटी यात्रेकरू या पवित्र उत्सवात सहभागी होतात. 'बम भोले' सह 'भारत माता की जय'चा जयघोषही करतात. त्यामुळे ही यात्रा श्रद्धेचे तसेच राष्ट्रीय एकता, सौहार्द आणि अखंडतेचे प्रतीक बनली आहे. समाजातील सर्व घटकांनी या यात्रेचे मनापासून स्वागत केले पाहिजे. यात्रेकरूंसाठी व्यवस्था करायला हवी होती पण दुर्दैवाने हरिद्वारहून दिल्लीला जाताना या यात्रेकरूंवर अनेकदा हल्ले झाले, त्यांची हत्या झाली. त्यांच्यावर मलमूत्र आणि मांसाचे तुकडे टाकून कावडची विटंबना करण्यात आली."

उत्तर प्रदेश सरकारने कावड यात्रेसंबंधित घेतलेले निर्णय आणि कावड यात्रेकरूंच्या दृष्टीने उपयुक्त असे निर्णय घेतले. त्याचे स्वागत करताना डॉ. सुरेंद्र जैन म्हणाले, योगी सरकार सत्तेत आल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या प्रतिष्ठेसाठी काही नियम बनवण्यात आले आणि त्याचे परिणाम हल्ला करणाऱ्या समाजावरही दिसून येत आहेत. काही इस्लाम समर्थकांनी त्या निर्णयाचे स्वागत करायला सुरुवात केली. मात्र काही जिहादी प्रवृत्तीचे लोक अद्यापही निरनिराळ्या प्रकारे कावड यात्रेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे.

पुढे ते म्हणाले, दुर्दैवाने काही लोक या मुद्द्याला राजकारणाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. ही यात्रा दरवर्षी एका निश्चित तारखेला होते. जे लोक याला राजकारणाशी जोडत आहेत ते प्रत्यक्षात हिंदू श्रद्धेचा अपमान करत आहेत. हे सहन करता येणार नाही. त्याने आपल्या मतपेढीला खूश करण्यासाठी इतके खालच्या पातळीवर जाऊ नये की त्याला पुन्हा उभे राहणे कठीण होईल.

Powered By Sangraha 9.0