‘ब्रह्मोस’ने सज्ज ‘आयएनएस तमाल’ पाकवर लक्ष ठेवणार

    01-Jul-2025   
Total Views |

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या नव्या स्टेल्थ फ्रिगेट आयएनएस तमालचे मंगळवारी रशियामध्ये कमिशन झाले. देशाबाहेर बांधलेली भारतीय नौदलाची ही शेवटची युद्धनौका असेल.

आयएनएस तमाल ही रशियाकडून मिळालेली आठवी आणि दुसरी तुशील श्रेणीची युद्धनौका आहे. ही २०१६ मध्ये झालेल्या भारत-रशिया संरक्षण कराराचा एक भाग आहे, ज्याअंतर्गत चार तलवार-श्रेणीची स्टेल्थ फ्रिगेट्स बांधली जात आहेत. यापैकी दोन रशियाच्या यंतर शिपयार्डमध्ये आणि दोन भारताच्या गोवा शिपयार्डमध्ये बांधली जात आहेत. तमाल हे रशियाच्या यंतर शिपयार्डमध्ये भारतीय तज्ञांच्या देखरेखीखाली बांधण्यात आले आहे. त्यात २६ टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाचा समावेश आहे. या जहाजाचा वेग ३० नॉट्स (५५ किमी प्रतितास) असून समुद्रातून हवेत हल्ला करण्याची क्षमता आहे.

आयएनएस तमाल ब्रह्मोस क्षेपणास्त्राने सुसज्ज आहे आणि रडारच्या कक्षेत न य़ेण्याची त्याची क्षमता आहे. ते नौदलाच्या पश्चिम ताफ्यात समाविष्ट केले जाईल. जेथे ते अरबी समुद्रात तैनात केले जाणार असून ते पाकिस्तानवर लक्ष ठेवणार आहे.

आयएनएस तमालची वैशिष्ट्ये

· या युद्धनौकेची खास गोष्ट म्हणजे त्याचे नाव आणि चिन्ह. 'तमाल' हे इंद्राच्या पौराणिक तलवारीचे नाव आहे आणि त्याची प्रतीकात्मक ओळख 'जांबूवंत' आणि रशियन अस्वलापासून प्रेरित 'ग्रेट बेअर्स' अशी आहे.

· तमाल हे भारतीय आणि रशियन सहकार्याचे प्रतीक आहे आणि त्याचे ब्रीदवाक्य 'सर्वदा सर्वत्र विजय' हे आहे.

· या युद्धनौकेच्या ऑपरेशन आणि तांत्रिक प्रणालींसाठी २०० हून अधिक भारतीय नौदल जवानांना रशियामध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे.