हिंमत असेल तर मुंबईत एकटे लढा; मंत्री आशिष शेलार यांचे विरोधकांना आव्हान

    01-Jul-2025   
Total Views |

मुंबई : कोणत्याही पक्षात हिंमत असेल तर त्यांनी मुंबईत स्वबळावर लढून दाखवावे, असे आव्हान मंत्री आशिष शेलार यांनी विरोधी पक्षांना दिले. मंगळवार, १ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.

मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार किंवा नाही हा त्यांचा प्रश्न आहे. कुटुंबाने एकत्र राहिले पाहिजे. कारण कुटुंब व्यवस्था ही समाजाची आणि आमच्या हिंदू धर्माच्या कार्यपद्धतीचा भाग आहे. त्यामुळे त्याला आमचे समर्थनच आहे. राहिला प्रश्न निवडणूकीतील बळाचा आणि कोण घाबरले याचा तर काँग्रेस, उबाठा गट, मनसे, शरद पवार गट यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मुंबईत एकटे लढावे," असे आव्हान त्यांनी दिले.

हर्षवर्धनजींचे वक्तव्य आणि भूमिका रावणाचीच
"आजपर्यंत ज्यांचा भुगोल आणि नागरिकसास्त्र कच्चे होते, दुर्दैवाने आता त्या हर्षवर्धन सपकाळ यांचे पुराण आणि इतिहासदेखील कच्चा आहे, असे म्हणावे लागेल. त्यामुळे रामविरोधी रावणाचीच भूमिका ते वाहत आहे. आयुष्यभर काँग्रेसने प्रभू रामचंद्र, त्यांचे अस्तित्व आणि रामसेतूविरोधात भूमिका घेतल्या, त्या हर्षवर्धनजींचे वक्तव्य आणि भूमिका रावणाचीच आहे, असे म्हणावे लागेल," अशी टीकाही त्यांनी केली.

लोकशाही मूल्यांवर चालणारा भाजप एकमेव पक्ष
"भारतीय जनता पक्ष हा संघटनात्मक कामांवर चालणारा पक्ष आहे. सदस्यांच्या पारदर्शकतेची नोंदणी आहे. वॉर्डापासून, तालुक्यापासून, प्रदेशापर्यंत अंतर्गत लोकशाहीची निवडणूक आहे, त्यामुळे लोकशाही मूल्यांवर चालणारा भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे. ज्यांच्याकडे संघटना नाही, लोकशाही प्रक्रिया नाही ते धाड दपटशाही, वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाणीवर चालणारे पक्ष आहेत. त्यामुळे अभिमानाने, गर्वाने आणि आनंदाने भारतीय जनता पक्षाच्या नवीन प्रदेशाध्यक्षांची घोषणा होणार आहे," असे त्यांनी सांगितले.

मुंबई भाजप अध्यक्षांची घोषणा लवकरच ते पुढे म्हणाले की,
"प्रत्येक कार्यकर्त्याला संधी आणि सामुहिक नेतृत्व ही भाजपची कार्यपद्धती आहे. त्यामुळे प्रदेशाबरोबरच माझीसुद्धा मुंबई अध्यक्षपदाची टर्म संपली आहे. केंद्र आणि आणि महाराष्ट्र भाजप मिळून लवकरच नवीन अध्यक्ष घोषित करतील. भारतीय जनता पक्षाकडे क्षमतावान कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. अन्य पक्ष हे व्यक्ती केंद्रित आहेत तर भाजप हा विचारधारा, संघटन आणि कार्यकर्त्यांची ताकद यावर केंद्रित आहे. आमचा पक्ष अन्य पक्षांसारखा घराणेशाहीवर किंवा परिवारवादावर चालणारा नाही. जो जो आमच्या विचारधारेत येईल त्याचे स्वागत आम्ही करणार आहोत. आम्ही सगळे मिळून निवडणूका लढू. आम्ही मुंबईत महायूतीतच लढू आणि महायूतीमध्येच जिंकूसुद्धा," असा विश्वासही मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला.




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....