मुंबई :मुंब्रा येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या प्रकरणात त्वरित न्याय मिळावा,यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना कदम म्हणाले, "या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. फॉरेन्सिक तपास अहवाल वेळेत मिळावा यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत."