"...तर मस्क यांना त्यांचं दुकान बंद करून दक्षिण आफ्रिकेला परतावं लागेल"; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा!

    01-Jul-2025   
Total Views |

वॉशिंग्टन : (Donald Trump) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांच्या धोरणांवरून टीका करणाऱ्या, नवा पक्ष काढण्याचा इशारा देणाऱ्या मस्क यांना यावेळी ट्रम्प यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एका बाजूला ट्रम्प यांच्या महत्त्वकांक्षी 'वन बिग, ब्युटीफुल बिल' विधेयकावर सिनेटमध्ये गेल्या १२ तासांपासून मतदान चालू असताना मस्क त्यावर सातत्याने टीका करत आहेत. मस्क यांच्या टीकेवर ट्रम्प यांनी पहिल्यांदाच त्यावर उत्तर दिले आहे.


डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की , "मी राष्ट्राध्यक्ष व्हावे यासाठी मस्क यांनी मदत केली होती. परंतु त्यापूर्वीच त्यांना माहित होते की, मी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याऱ्या धोरणांच्या विरोधात आहे. प्रत्येक व्यक्तीवर इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही. कदाचित मानवी इतिहासात कोणालाही मिळाली नसेल एवढी सबसिडी मस्क यांना मिळाली परंतु आता मात्र, सबसिडीशिवाय त्यांना त्यांचं दुकान बंद करून दक्षिण आफ्रिकेला परत जावे लागेल. कारण सबसिडीशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर रॉकेट लॉन्चर, सॅटेलाईट आणि इलेक्ट्रिक कार्सचे उत्पादन होणार नाही. यामुळे आम्ही खूप पैसे वाचवू शकू", असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच डॉजने मस्क यांना मिळालेली सरकारी अनुदानांची चौकशी करावी आणि त्यामध्ये कपात करावी, असेही म्हटले आहे.

एलॉन मस्क हे अमेरिकेतील मोठे उद्योगपती असले तरी ते मूळचे दक्षिण आफ्रिकेचे आहेत. त्यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला असून तिथेच त्यांचे बालपण गेले. १९८९ साली मस्क हे १७ वर्षांचे असताना त्यांनी दक्षिण आफ्रिका सोडली आणि ते कुटुंबासमवेत कॅनडाला गेले. काही वर्षे कॅनडात राहिल्यानंतर मस्क यांचे कुटुंब अमेरिकेत वास्तव्यास गेले आणि तिथेच स्थायिक झाले. मस्क यांनी पुढे अमेरिकेतच त्यांचा व्यवसाय सुरू केला.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\