दररोज निलंबित करा काहीही फरक पडत नाही : नाना पटोले

    01-Jul-2025   
Total Views |

मुंबई : एक दिवस नाही तर रोज निलंबित केले तरी आम्ही थांबणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे. अयोग्य वर्तनामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवार, दि. १ जुलै रोजी त्यांचे दिवसभरासाठी निलंबन केले. त्यानंतर त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.

नाना पटोले म्हणाले की, "सरकारमधील आमदार आणि कृषीमंत्री शेतकऱ्याला भिकारी समजतात. जो शेतकऱ्यांबद्दल बोलतो त्याला सभागृहातून निलंबित करतात. जो शेतकऱ्यांच्या विरोधात बोलतो त्यांना सन्मानाने वागवतात. महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. आम्ही शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही. आम्ही रोज सरकारच्या विरोधात आवाज उठवू. एक दिवस नाही तर रोज निलंबित केले तरी आम्ही थांबणार नाही. उद्या पुन्हा आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू. आम्ही आता शांत बसणार नाही," असे ते म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?
सभागृहात शेतकरी मुद्द्यावर चर्चेदरम्यान नाना पटोले यांनी कृषिमंत्र्यांवर शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप केला. पटोले यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करताना म्हटले, “लोणीकर आणि कृषिमंत्री सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करतात. त्यांनी जाहीर माफी मागावी. मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही”, असे असंसदीय वक्तव्य त्यांनी केले. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी अशा प्रकारची भाषा सभागृहात अपेक्षित नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतरही विरोधकांनी घोषणाबाजी सुरू ठेवली. त्यामुळे दुपारी १२ वाजता सभागृह पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही विरोधकांची घोषणाबाजी थांबली नाही. यावेळी पटोले यांनी सभापतींच्या दिशेने धाव घेतली आणि राजदंडाला स्पर्श केला. विरोधकांचा गोंधळ पाहता अध्यक्षांनी नाना पटोले यांना संपूर्ण दिवसासाठी निलंबित करण्याची घोषणा केली.






अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....