नेते तुपाशी, कार्यकर्ते उपाशी!

    01-Jul-2025   
Total Views |

मुंबई
: पक्ष गडगडतोय, नेतृत्व गोंधळलेलं... आणि नेत्यांना चिंता आहे ती फक्त जेवणाच्या प्रोटोकॉलची! अंबादास दानवे यांच्या दालनात मंगळवारी जे घडलं, ते कुठल्याही कार्यकर्त्याच्या आत्माभिमानाला तडा देणारं होतं. ‘नेते तुपाशी, कार्यकर्ते उपाशी’, या म्हणीप्रमाणे जिवंत दृश्य विधानभवनात पहायला मिळालं आणि त्याने पक्षातली दुर्दशा उघडी पाडली.

दुपारी दीडच्या सुमारास विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात काही कर्मचारी आणि कार्यकर्ते जेवण घेत होते. एवढ्यात आमदार सुनील प्रभू काही पत्रकारांसह दालनात दाखल झाले. जागा कमी असल्याने प्रभू यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त केला. “कुणालाही जेवणाला का बसवता? आमदारांसाठी स्वतंत्र व्यवस्था हवी,” असा जाहीर दम त्यांनी दिला.

प्रभू यांच्या रागामुळे दानवे यांचे पीए मोरे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना तात्काळ बाहेर जाण्यास सांगितले. बहुतेकांनी अर्धवट जेवण सोडून बाहेर पडण्याचा मार्ग पत्करला. पण एक कार्यकर्ता मात्र थांबला. “माझं जेवण अर्धवट आहे, ते पूर्ण करूनच बाहेर जाईन,” असा त्याचा शांत पण ठाम सूर होता.

हे प्रभूंना सहन झालं नाही. “याला ताबडतोब बाहेर हाकला,” असा आदेश त्यांनी सोडला. कार्यकर्त्याने विनम्रपणे, “मी सुद्धा पक्षाचा पदाधिकारी आहे,” असे सांगितले. त्यावर उपरोधिक स्वरात प्रभूंनी विचारलं, “पदाधिकारी असलास म्हणून काय झालं?”

यावर, मोरे यांनीही संयम गमावला. “असले खूप पदाधिकारी पाहिले आहेत,” असं म्हणून त्यांनी त्या कार्यकर्त्याला हुसकावून लावलं. पण, या प्रकारामुळे तो प्रामाणिक कार्यकर्ता अंतर्बाह्य त्रस्त झाला. “या पक्षात पुन्हा कधीही पाऊल ठेवणार नाही,” असा ठाम निर्धार करत तो तिथून बाहेर पडला, तो कायमचाच!

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.