सात्विक जीवनशैली, पर्यावरण रक्षण आणि देशी पर्यटन म्हणजे जीवन समृद्ध करणारे मूलमंत्र : सुचिता भिकाने

- छत्रपती संभाजीनगर परिमंडळात २० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

    01-Jul-2025
Total Views |

Sattvic lifestyle, environmental protection and domestic tourism are the basic mantras that enrich life Suchita Bhikane
 
मुबंई: नव्या पिढीने आपल्या आरोग्याचा, पर्यावरणाचा आणि संस्कृतीचा विचार करत जीवन जगण्याची दिशा ठरवायला हवी. सात्विक आहार स्वीकारणं, कृत्रिम जीवनशैलीपासून दूर राहणं, देशी पर्यटनातून भारताची संस्कृती समजून घेणं आणि वृक्षसंवर्धनातून पर्यावरणाचं रक्षण करणं हे जीवन समृद्ध करणारे मूलमंत्र आहेत, असे मार्गदर्शन अप्पर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव व संसाधन) सुचिता भिकाने यांनी केले.
 
महापारेषण कंपनीच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त छत्रपती संभाजीनगर परिमंडळात २७ जून २०२५ रोजी महापारेषणचा २० वा वर्धापनदिन आणि पारितोषिक वितरण समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महापारेषण कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आदरणीय संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 
या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि प्रमुख पाहुणे म्हणून सुचिता भिकाने या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे मुख्य अभियंता नसीर कादरी होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करून सोहळ्याची सुरुवात झाली.
 
प्रास्ताविक अधीक्षक अभियंता (प्रकल्प)  संजीव कुमार सुरडकर यांनी केले. त्यांनी पारितोषिक योजनेमागील हेतू आणि सन २०२४–२५ या वर्षात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे तपशीलवार वर्णन केले. या प्रसंगी संपूर्ण मराठवाड्यातील महापारेषणचे अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात विविध विभागांच्या कार्याचे मूल्यमापन करून त्यांच्या उत्कृष्टतेचा गौरव करण्यात आला. विद्युत प्रणाली व प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, वाळूज, छत्रपती संभाजीनगर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील २२० केव्ही नागेवाडी आणि १३२ केव्ही किल्लारी या उपकेंद्रांना प्रथम क्रमांक, तर २२० केव्ही पडेगाव आणि १३२ केव्ही बदनापूर उपकेंद्रांना द्वितीय क्रमांक देण्यात आला. अउदा वाहिनी उपविभागांतर्गत वाघाळा उपविभागाला प्रथम व धाराशिव उपविभागाला द्वितीय क्रमांक मिळाला. प्रकल्प विभागात छत्रपती संभाजीनगर विभाग प्रथम, परभणी विभाग द्वितीय आणि लातूर विभाग तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. बांधकाम विभागात लातूर विभागाला प्रथम व परभणी विभागाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. तसेच सर्वेक्षण व अन्वेषण विभागात छत्रपती संभाजीनगर विभागाने प्रथम क्रमांक पटकावला. या कार्यक्रमात मानव व संसाधन विभाग, वित्त व लेखा विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध समूहांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण या सोहळ्यात विशेष आकर्षण ठरले.
 
या सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिलेल्या मा. श्रीमती सुचिता भिकाने यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना आरोग्य, पर्यावरण आणि जीवनशैली या विषयांवर चिंतन करायला भाग पाडणारे विचार मांडले. त्यांनी सांगितले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात पिझ्झा, बर्गर अशा कृत्रिम अन्नपदार्थांपासून दूर राहून पारंपरिक, शुद्ध आणि सात्विक आहार अंगीकारणे अत्यावश्यक आहे. नैसर्गिक जीवनशैली स्वीकारल्यास शरीर आणि मन दोघांनाही ताजेतवाने ठेवता येते. त्याचप्रमाणे, वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर उपाय म्हणून वृक्षारोपण ही काळाची गरज असून, प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जबाबदारीने पुढे आले पाहिजे. झाडांअभावी अनेक प्राणी आणि पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात येते, ही बाब समाजाने गांभीर्याने घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आपल्या भारत देशातच निसर्गसंपन्न, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अशा अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये परदेशवारीपेक्षा देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य दिल्यास आपल्याला देशाची खरी ओळख होते, स्थानिकांना रोजगारही मिळतो आणि आपली संस्कृती अधिक दृढ होते, असेही त्या म्हणाल्या. त्यानंतर महावितरणचे छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे मुख्य अभियंता मा. श्री. कछोट यांनी वर्धापन दिनानिमित्त मार्गदर्शन करताना महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्या एकाच कुटुंबाचा भाग असल्याचे नमूद केले. महापारेषणद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध पायाभूत प्रकल्पांमुळे महावितरणला अधिक सक्षमपणे अखंड वीज पुरवठा करता येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात मुख्य अभियंता श्री. नसीर कादरी यांनी सांगितले की, वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिरांचे आयोजन संपूर्ण मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये करण्यात आले होते, ज्यात एकाच दिवशी तब्बल २५९ जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच, पर्यावरणपूरक वृक्षारोपण उपक्रम अंतर्गत एकूण २००१ झाडांची लागवड करण्यात आली. विशेषतः ७६५ केव्ही एकात्मिक ऊर्जा प्रकल्प परिसरात ५०० झाडांची लागवड करण्यात आली असून, हा उपक्रम महत्त्वपूर्ण व स्तुत्य ठरला आहे. यावर्षी महापारेषणने ९९.७८ टक्के उपलब्धता (Availability) साध्य केली असून, कंपनीला भंगार विक्रीतून विक्रमी १० कोटी रुपयांचा नफा झाल्याची माहिती त्यांनी दिली. ही कामगिरी शक्य होण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.