फिनिक्स झेप : डॉ. स्मिता गालफाडे

01 Jul 2025 11:48:05
 
Dr. Smita Galphade
 
राखेतून फिनिक्स पक्ष्याने झेप घ्यावी, असेच मुंबईतील नायर रुग्णालयामध्ये शरीरशास्त्राच्या सहयोगी प्राध्यापिका असलेल्या डॉ. स्मिता गालफाडे यांचे आयुष्य. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...
 
एमबीबीएस च्या परीक्षेमध्ये स्मिता महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. डॉक्टर व्हायचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र, त्याचवेळी त्या आजारी पडल्या. त्यांना किडनीच्या आजाराचे निदान झाले. उपचारासाठी अंबेजोगाईहून सलग तीन वर्षे स्मिता आणि त्यांचे आईवडील उपचारासाठी मुंबईला केईएम रुग्णालयात येत असत. मुंबईतला उपचार, इतर खर्च आणि सोबतचे रुग्ण यांमुळे स्मिता यांनी ठरवले की, आपण मुंबईतच ‘एमडी’चे शिक्षण पूर्ण करायचे. ‘आयसीयू’मध्ये असताना त्यांनी अभ्यास केला. जीवनमरणाच्या या खेळात त्या जिंकल्या. आजाराला परतवलं आणि त्यांनी केईएम रुग्णालयातून ‘एमडी फिजिओलॉजी’ शिक्षण पूर्ण केले. राखेतून फिनिक्स पक्ष्याने झेप घ्यावी, मुंगीने भव्य स्वप्न पाहात आकाशी उडावे, असे काहीसे आयुष्य डॉ. स्मिता गालफाडे यांचे आहे.
 
महिला आरोग्य क्षेत्रात सेवा जागृती कार्य करायचे, असा त्यांचा निश्चय असून, त्याला कारणही तसेच आहे. 2007 सालची गोष्ट. डॉ. स्मिता या अंबेजोगाईच्या रुग्णालयात इंटर्नशिप करत होत्या. एकेदिवशी रुग्णालयात एका गरोदर मुलीचा रक्तदाब भयंकर वाढला. डॉ. स्मिता यांनी त्या मुलीवर उपचार केले. दुसर्‍या दिवशी स्मिता यांनी विचारले, “तुला काय झाले होते?” तिने सांगितले, “दहाव्या वर्षी तिचे लग्न झाले. 14व्या वर्षी ती सासरी गेली. तिथे ऊसतोड कामगार म्हणून मजुरी करणे, घरदार सांभाळणे, दारूड्या नवर्‍याकडून शारीरिक-मानसिक त्रास सहन करणे, असे तिचे दैनंदिन आयुष्य. अशातच ती गरोदर राहिली. मात्र, बाळंतकळा येईपर्यंत ती काम करत राहिली. तिला दवाखान्यात आणले आणि ती घाबरली. कारण, आयुष्यात ती कधीही डॉक्टरकडे गेली नव्हती. अनेकदा ती आजारी पडली होती किंवा पडून वगैरे मारसुद्धा लागला होता; पण तिला दवाखान्यात कधीही कुणीही नेले नव्हते. मुलीसाठी काय पैसे आणि वेळ मोजायचा? असेच मत होते. आताही ती गरोदर असताना तिची कसलीही चाचणी करण्यात आली नव्हती. अशा काही चाचण्या असतात, हे तिच्या गावीही नव्हते.
 
समाजात आजही स्त्रियांची स्थिती अशी आहे. समाजाचे वास्तव जाणून घेण्यासाठी स्मिता यांनी काम सुरू केले. कष्टकरी महिलांच्या व्यथा शब्दातीत होत्या. उर्वरीत समाज या आयाबायांच्या प्रश्नांपासून अनभिज्ञच होता. त्यावेळी स्मिता यांनी ठरवले की, हे चित्र बदलायला हवे. महिलांच्या आरोग्य क्षेत्रामध्ये काम करायचे. या डॉ. स्मिता म्हणजे, मुंबईत वैद्यकीय शिक्षणासाठी येणार्‍या अनुसूचित जाती-जमातींच्या मुलींसाठी हक्काच्या मार्गदर्शिका. वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या अनेक मुलामुलींना वैद्यकीय क्षेत्रातील शब्द हे कधी कानीही पडलेले नसतात. त्यामुळे त्यांना शिक्षण घेताना अडथळे येतात. विद्यार्थ्यांनी या अडचणीवर मात करावी, म्हणून डॉ स्मिता विद्यार्थ्यांचे समुपदेशन करतात. त्यांना मार्गदर्शन करतात. ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर मेडिकल असोसिएशन’ अर्थात ‘दामा’ या संस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणार्‍या अनुसूचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरि सहकार्य करतात. आज त्या नायर रुग्णालयामध्ये शरीरशास्त्राच्या सहयोगी प्राध्यापिका आहेत.
 
त्यांच्या जीवनाचा मागोवा घेऊ. अंबेजोगाईतील मातंग समाजाचे पांडुरंग आणि बबिता गालफाडे यांना चार अपत्ये. त्यांपैकी एक डॉ. स्मिता. पांडुरंग हे शिक्षक आणि आंबेडकरी चळवळीचे खंदे कार्यकर्ते.कोणत्याही परिस्थितीमध्ये मुलांनी शिकावे आणि समाजाच्या प्रगतीसाठी आपणही खारीचा वाटा उचलायलाच हवा, असे या दाम्पत्याचे म्हणणे. घरची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्यच. बबिता म्हणत, “मला कशाला हवाय दागिना. माझ्या मुलींचे शिक्षण हेच माझा दागिना!” या सगळ्यामुळे स्मिता यांना शिक्षणाची गोडी लागणार नाही, तर नवल! स्मिता दहावी आणि बारावीमध्येही गुणवत्ता यादीत आल्या. पुढे त्यांना ‘एमबीबीएस’ शिक्षणासाठी गावातल्याच वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. त्यामुळे त्या अनिवासी पद्धतीने शिक्षण घेऊ लागल्या. वैद्यकीय शाखेची महागडी पाठ्यपुस्तके विकत घेणे परवडणार नव्हते. त्यावेळी वाचनालयातून पुस्तक आणून 21-21 तास त्यांनी अभ्यास केला. ‘एमबीबीएस’ आणि पुढे ‘एमडी’ही विशेष प्राविण्यासह त्या उत्तीर्ण झाल्या. पण, इतक्या शिकलेल्या मुलीला तिच्या तोलामोलाचा नवरा मुलगा कसा मिळणार? लोक बोलू लागले मुलीला शिकवलंच कशाला इतकं? पण, पुढे डॉ. स्मिता यांचा मंदार तोडणकर या अत्यंत समाजशील व्यक्तीसोबत आंतरजातीय विवाह झाला. पुढे स्मिता यांना मातृत्वाची चाहुल लागली. मात्र, सहाव्या महिन्यातच निष्पन्न झाले की, पोटातले बाळ विशेष आहे. सहावा महिना असल्याने येणार्‍या बाळाचे स्वागत करावे लागले. मंदार आणि स्मिता यांनी ठरवले की, बाळ जरी विशेष असले, तरीसुद्धा त्याच्या जीवनात ते विशेष कर्तृत्व करणार. त्या जिद्दीने ते बाळाचे संगोपन करत आहेत.
 
आयुष्यात अनेक संकटं आली. मात्र, डॉ. स्मिता थांबल्या नाहीत. राखेतून फिनिक्स पक्ष्याने झेप घ्यावी, तशा त्या समस्यांवर मात करत राहिल्या. प्रत्येक वेळी स्वतःसोबत कुटुंब आणि समाजाचे नाव उजळवत राहिल्या.
 
Powered By Sangraha 9.0