दहशतवादाला प्रोत्साहन देणार्‍यांना पाकिस्तानकडून मिळते बक्षीस - शशी थरूर यांची टीका

09 Jun 2025 16:00:33

terrorism receive rewards from Pakistan shashi tharur
 
वॉशिंग्टन : अमेरिका-पाकिस्तान यांच्यात दि. 6 जून रोजी झालेल्या चर्चेनंतर, अमेरिकन काँग्रेसचे सदस्य ब्रॅड शेरमन यांनी सोशल मीडियावर दहशतवादविरोधी चर्चांवर प्रकाश टाकणारी महत्त्वाची माहिती दिली आहे. शेरमन यांच्या पोस्टला उत्तर देताना काँग्रेस खा. शशी थरूर यांनी “डॉ. शकील आफ्रिदी यांच्या सुटकेसाठी अमेरिकेने केलेली मागणी पाकिस्तानच्या दहशतवादाविरोधातील स्वागतार्ह पाऊल आहे,” असे म्हटले आहे.
 
खा. शशी थरूर यांनी म्हटले आहे की, “पाकिस्तान हा असा देश आहे, ज्याने केवळ दहशतवादी सूत्रधार ओसामा बिन लादेनला आश्रय दिला नाही; तर त्याला पकडून देण्यासाठी अमेरिकेला साहाय्य करणार्‍या धाडसी डॉ. शकील आफ्रिदीला अटक करून शिक्षाही दिली. पाकिस्तानमध्ये तुम्हाला दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याबद्दल बक्षीस दिले जाते आणि दहशतवादाविरोधात बोलल्यास छळ केला जातो.”
 
पाकिस्तानने दहशतवादाविरोधात प्रयत्न करावेत
 
2002 मध्ये ‘वॉल स्ट्रीट जर्नल’चे पत्रकार डॅनियल पर्ल यांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा उल्लेख करून पाकिस्तानी शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेदरम्यान ब्रॅड शेरमन यांनी दहशतवादाशी लढण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
 
ते म्हणाले, “पर्ल यांचे कुटुंब अजूनही माझ्या जिल्ह्यात राहते, पाकिस्तानने या नीच गटाला संपवण्यासाठी आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत.” शेरमन यांनी पुढे असेही नमूद केले की, “या चर्चेत ‘सिंधू पाणी करार’ आणि भारताकडे जाणारे पाणी रोखण्यात चीनची भूमिका यांचा समावेश होता.”
 
Powered By Sangraha 9.0