धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ‘उबाठा’ला व्यंगचित्रातून फटकारे

09 Jun 2025 18:10:25


मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करून धारावी बचाव आंदोलनाची हाक देणाऱ्या ‘उबाठा’ गटाला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेने व्यंगचित्र काढून फटकारले आहे. शिवसेनेकडून हे व्यंगचित्र त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रसिद्ध करण्यात आले असून, सध्या ते सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.


धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी तेथील रहिवाशांच्या घरांची नोंदणी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आली आहे. देशात प्रथमच एखाद्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील अपात्र रहिवाशांना घरे देण्याचा निर्णय धारावीचे पुनर्वसन करताना राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे अपात्र झोपडीधराकांना सुद्धा हक्काची घरे मिळणार आहेत. तसेच पात्र, लाभार्थ्यांना ३५० चौरस फुटांची घरे देखील मुंबईत मिळणार आहेत. मात्र, याला थेट विरोध करण्याची भूमिका उबाठा गटाने घेत धारावी बचाव नावाने आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या या भूमिकेला प्रत्यक्ष धारावीतील सामान्य झोपडपट्टीधारक देखील विरोध करत आहेत. कारण, या झोपडपट्टी धारकांना हक्काचे व स्वतःच्या नावावर असलेले घर हवे आहे. म्हणूनच, ९० टक्क्यांहून अधिक धारावीकरांनी धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी राबवण्यात आलेल्या नोंदणी प्रक्रियेत सहभाग घेतला.


मात्र, उबाठा गट याला विरोध करू पाहत असल्याने धारावीकर नाराज झाले आहेत. अशा या धारावीकरांना हक्काचे घर मिळू नये यासाठी प्रयत्नशील असलेल्या उबाठा गटाला शिवसेनेने व्यंगचित्रातून फटकारले आहे. धारावी बचाव आंदोलनाच्या फलकास एका सामान्य धारावीकराला स्वतः उद्धव ठाकरे बांधत असल्याचे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. तसेच, तो हतबल धारावीकर समोर पडलेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पातील घराच्या चावीकडे बोट दाखवत असल्याचे दृश्यंही यात दाखवले गेले आहे. सध्या हे व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, अनेक जण सोशल मीडियावर या व्यंगचित्राचा आधार घेऊन व्यक्त होत आहेत.

Powered By Sangraha 9.0