भारतीय जवान उद्या अंतराळात झेपावणार ; शुभांशु शुक्ला इतिहास रचणार; धाडस, वैज्ञानिक क्षमता आणि लष्करी प्रशिक्षणाच्या उत्कृष्टतेचे प्रतीक

09 Jun 2025 15:17:36

Shubhanshu Shukla launching to the Space Station on Tuesday aboard Dragon spacecraft
 
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील एक धाडसी आणि प्रतिभावान वैमानिक, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला मंगळवार, दि. 10 जून रोजी ‘ड्रॅगन स्पेसक्राफ्ट’मधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर झेप घेणार आहेत.
 
हे भारतासाठी केवळ एक अंतराळमिशन नाही, तर धाडस, वैज्ञानिक क्षमता आणि लष्करी प्रशिक्षणाच्या उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. शुभांशु शुक्ला यांचा प्रवास 2006 साली ‘एअर फोर्स अ‍ॅकेडमी’मधून सुरू झाला. एक उत्कृष्ट लढाऊ वैमानिक म्हणून त्यांनी शत्रूचे संभाव्य धोके ओळखून विमानांची ताकद आणि कमजोरी शोधली. याच कौशल्याने त्यांना चाचणी वैमानिक म्हणून पुढील टप्प्यावर पोहोचवले, एक असे पद जे भारतीय हवाई दलात अत्यंत प्रतिष्ठेचे आणि कठीण मानले जाते.
 
‘आयएएफ’मध्ये चाचणी वैमानिक होण्यासाठी अत्यंत काटेकोर निवड प्रक्रिया असते. ‘स्क्वॉड्रन लीडर रँक’ किंवा त्याहून वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये उत्कृष्ट ऑपरेशनल रेकॉर्ड आणि किमान 1 हजार, 500 तासांचे उड्डाण अनुभव असणे आवश्यक असते. शिवाय, स्वेच्छेने अर्ज करावा लागतो आणि वैद्यकीय दृष्ट्या ’ए1जी1’ दर्जा असणे गरजेचे असते. निवड झाल्यानंतर, बंगळुरुमधील ‘एएसटीई’ येथे 48 आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण घेतले जाते. यामध्ये तांत्रिक चाचण्या, सिम्युलेटर उड्डाण, विविध विमानांवर थेट उड्डाण करताना अहवाल तयार करणे, प्रणाली समजून घेणे यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश असतो.
 
 
 
Powered By Sangraha 9.0