मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Massive Protest in Los Angeles) अमेरिकेत लॉस एंजेलिस येथे स्थलांतरित समुदाय आणि यूएस इमिग्रेशन व कस्टम्स एन्फोर्समेंट यांच्यातील संघर्ष हिंसक वळणावर गेल्याचे निदर्शनास येते आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेले निदर्शन हाताळणे कठीण होत चालल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी निदर्शकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्याचवेळी, निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक आणि फटाके फेकले. संपूर्ण परिसरात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वादग्रस्तपणे नॅशनल गार्ड तैनात केल्यानंतर निदर्शनांना हिंसक वळण आल्याचे समोर येते आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, हजारो निदर्शकांनी लॉस एंजेलिस शहरात हैदोस घातला. त्यांनी प्रमुख महामार्ग रोखले आणि शेकडो वाहने पेटवली. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉस एंजेलिसमध्ये २००० नॅशनल गार्ड्स तैनात करण्याची घोषणा केली. ट्रम्प यांनी कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर आणि लॉस एंजेलिसचे महापौर यांच्यावर एक्स-पोस्टवरून टीका केली आहे आणि या परिस्थितीसाठी त्यांना जबाबदार धरले आहे.
त्यांनी म्हटले की, "जर कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम आणि लॉस एंजेलिसचे महापौर करेन बास हे त्यांचे काम करू शकत नसतील, जे सर्वांना माहित आहे की ते करू शकत नाहीत, तर सरकार हस्तक्षेप करेल आणि दंगेखोरांच्या समस्येचे निराकरण ज्या पद्धतीने केले पाहिजे त्या पद्धतीने करून ते सोडवेल". सध्या या प्रकरणी ४४ जणांना ताब्यात घेण्यात आलेय.