लोकल ट्रेन अपघाताच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

09 Jun 2025 12:05:27
 
Devendra Fadanvis
 
मुंबई : दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान घडलेल्या लोकल ट्रेन अपघाताच्या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. या दुर्घटनेत जवळपास ५ ते ६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.
 
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत या दुर्घनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते म्हणाले की, "दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण ८ प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत."
 
घटना कशामुळे घडली याबाबत चौकशी सुरु!
 
"जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 
नेमकं काय घडलं?
 
सोमवार, ९ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास मुंब्रा स्थानकादरम्यान दोन लोकल ट्रेन एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात असताना दरवाजात लटकलेले प्रवाशी एकमेकांना घासले गेले. दरम्यान, लोकमधून खाली पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत ८ प्रवाशी खाली पडले असून त्यातील ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0