जलसंपदा विभागातील बदल्यांना मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती

09 Jun 2025 16:29:26

Chief Minister suspends transfers in Water Resources Department


मुंबई : जलसंपदा विभागातील अभियंत्यांच्या बढती आणि बदल्यांच्या प्रक्रियेत आर्थिक व्यवहारांच्या गंभीर तक्रारी पुढे आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण कारवाईला तत्काळ स्थगिती दिली आहे. विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी यासंदर्भात सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता.


राज्यातील कृषी व्यवस्था आणि सिंचन प्रकल्पांचा कणा मानल्या जाणाऱ्या जलसंपदा विभागात सहायक अभियंता ते कार्यकारी अभियंता स्तरावर ६० हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढतींची यादी नुकतीच तयार करण्यात आली होती. मात्र या प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत विभागात आणि मंत्रालयातच तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. विशेषतः, या बदल्यांमध्ये अर्थपूर्ण व्यवहार झाले असल्याच्या तक्रारी काही लोकप्रतिनिधींनी आणि खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानंतर प्रधान सचिव कपूर यांनी या संदिग्ध प्रक्रियेचा सविस्तर अहवाल तयार करून थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला.


या अहवालात काही निवडक अधिकाऱ्यांना प्राधान्याने लाभ मिळाल्याचे, तसेच काही बदल्यांमध्ये नियमानुसार प्रक्रिया न पाळल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या सर्व बदल्या आणि बढत्या स्थगित करत, पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही हालचाल न करण्याचे आदेश दिले आहेत.
Powered By Sangraha 9.0