युनूस सरकारच्या बांगलादेशात महिलांवर अतोनात अत्याचार; ढाका विद्यापिठाच्या प्राध्यापिकेकडून मोठा खुलासा

09 Jun 2025 15:46:23

Bangladesh violence against women

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bangladesh violence against women) 
बांगलादेशात झालेल्या सत्तांतरानंतर मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. माजी पंतप्रधान यांना पदावरून हटवण्यासाठी झालेल्या तथाकथित विद्यार्थी आंदोलनात अनेक महिला देखील उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. या चळवळीला बौद्धिक आधार देण्यात अनेक प्राध्यापकांनी सुद्धा भूमिका बजावली. मात्र शेख हसीना यांचा सत्तेतून पायउतार झाल्यानंतर इस्लामिक कट्टरपंथीयांनी येथील महिलांना लक्ष्य करत त्यांच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. ढाका विद्यापीठाच्या प्राध्यापिका झुबैदा नसरीन ज्या शेख हसीना यांना पदच्युत करण्याच्या चळवळीचा एक प्रमुख चेहरा होत्या, त्यांनी एका वृत्तवाहिनिशी बोलताना बांगलादेशात सामान्य महिलांसाठी राहणे कसे कठीण होत चालले आहे याबाबत खुलासा केलाय.

हे वाचलंत का? : श्री पद्मनाभस्वामी मंदिरात २७० वर्षांनंतर पार पडला महाकुंभाभिषेक

बांगलादेशातील महिला आयोगाने काही शिफारशी केल्या होत्या, ज्यांचा कट्टरपंथी शक्तींनी विरोध केला आणि असेही म्हटले की हे सर्व पश्चिमेचे षड्यंत्र आहे. या शिफारशींविरुद्ध मोर्चेही काढण्यात आले. प्रा. झुबैदा म्हणाल्या की, महिलांची स्थिती सुधारण्यासाठी आयोगाने केलेल्या शिफारशी कट्टरपंथींनी नाकारल्या. समितीमध्ये काम करणाऱ्या महिलांना उघडपणे धमकावले गेले आणि बदनामी केली गेली. त्यांना गप्प करण्यासाठी वेश्या व्यवसाय करणाऱ्या म्हणून देखील म्हटले गेले.
 
पुढे प्रा. झुबैदा यांनी सांगितले की, हेफाजत-ए-इस्लाम आणि जमात-ए-इस्लामी सारख्या गटांनी आयोगाच्या शिफारशींविरुद्ध निषेध केला होता आणि आयोगाच्या शिफारशींवर कारवाई न करण्यासाठी सरकारवर दबाव आणला होता. गेल्या वर्षी जेव्हा मुली आंदोलनात सहभागी होत होत्या तेव्हा त्यांच्या कपड्यांवर कोणीही भाष्य केले नव्हते. ते रात्रीच्या वेळीही तेच कपडे घालून निषेधांमध्ये सहभागी होत असत, पण आता महिलांना अपशब्द आणि छळाला सामोरे जावे लागत आहे.
Powered By Sangraha 9.0