वॉशिंग्टन डीसी : (US Congressman Brad Sherman Slams Pakistan Delegation) पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरअंतर्गत झालेल्या लष्करी कारवाईनंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधातील भूमिका मांडण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांची शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवली. त्यानुसार या शिष्टमंडळांनी विविध देशांना भेटी दिल्या. दरम्यान, भारताच्या या निर्णयाचे अनुकरण करत पाकिस्ताननेही वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्या खासदारांच्या शिष्टमंडळांना पाठवल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, या शिष्टमंडळापैकी एक पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी शिष्टमंडळ नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना भेटीदरम्यान अमेरिकेत पाकिस्तानच्या खासदारांना दहशतवादावरून चांगलेच खडेबोल सुनावल्याचे सांगितले जात आहे.
अमेरिकन काँग्रेसचे सदस्य ब्रेड शेरमन यांनी पाकिस्तानला चांगलेच फटकारले आहे. पाकिस्तानने दहशतवादी संघटनांचा नायनाट केला पाहीजे, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच पाकिस्तान स्थित 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेविरोधात निर्णायक कारवाई केली पाहिजे. कारण ही संघटना पत्रकार डॅनियल पर्ल यांच्या हत्येसाठी जबाबदार आहे, असे ब्रेड शेरमन यांनी म्हटले आहे. याबाबत ब्रेड शेरमन यांनी एक्सवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. दरम्यान, २००२ मध्ये वॉल स्ट्रीट जर्नलचे रिपोर्टर डॅनियल पर्ल यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणात दहशतवादी उमर सईद शेखला दोषी ठरवण्यात आले होते.
तसेच पाकिस्तान स्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेला संपवण्यासठी आणि प्रदेशातील दहशतवादाशी लढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचेही ब्रेड शेरमन यांनी म्हटले आहे. दरम्यान, ब्रेड शेरमन यांनी पाकिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्याकांच्या स्थितीबाबतही चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, "ख्रिश्चन, हिंदू आणि अहमदिया मुस्लिम यांना हिंसाचार, छळ, भेदभाव किवा असमानतेच्या भीतीशिवाय त्यांच्या श्रद्धेचे पालन करण्याची आणि लोकशाही व्यवस्थेत सहभागी होण्याची परवानगी दिली पाहिजे", असेही ब्रेड शेरमन यांनी म्हटले आहे. तसेच पाकिस्तानी डॉक्टर डॉ. शकील आफ्रिदीची सुटका करण्याची मागणी देखील ब्रेड शेरमन यांनी केली आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\