बंगळुरू : (Police Complaint against Virat Kohli over Bengaluru Stampede) आरसीबीच्या विजयानंतर बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी भारतीय क्रिकेटपटू आणि आयपीएल २०२५ विजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा खेळाडू विराट कोहली याच्याविरुद्ध क्यूबन पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एच.एम. वेंकटेश यांनी ही विराट कोहलीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता या तक्रारीवरुन पोलीस कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून विराट कोहलीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
या संदर्भात पोलिसांनी जारी केलेल्या अधिकृत पत्रात म्हटले आहे की, "तुम्ही सादर केलेली तक्रार प्राप्त झाली आहे. तुमच्या तक्रारीत नमूद केलेल्या घटनेसंदर्भात १२३/२०२५ अंतर्गत आधीच गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. त्यामुळे तुमच्या तक्रारीचीही त्याच क्रमाने चौकशी केली जाईल."
RCB च्या मार्केटिंग हेडला अटक
आरसीबीच्या मार्केटिंग हेड निखिल सोसाळे याला शुक्रवारी ६ जूनला अटक करण्यात आली आहे. तसेच, याप्रकरणी आरसीबीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. निखिल सोसाळे हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मार्केटिंग आणि रेवेन्यू प्रमुख आहेत. निखिल सोसाळे हे आरसीबीचे एक प्रमुख सपोर्ट स्टाफ सदस्य आहेत, जे बंगळुरूस्थित फ्रँचायझीसाठी सर्व पीआर आणि ब्रँड मार्केटिंग व्यवस्थापित करतात.
चेंगराचेंगरीनंतर विराट कोहली काय म्हणाला?
एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर विराट कोहलीने समाजमाध्यमांवर भावनिक प्रतिक्रिया दिली होती. "माझ्याकडे काही बोलण्यासाठी शब्दच उरले नाहीत... मी पूर्णपणे अस्वस्थ झालोय", असे विराटने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.
नेमकं काय घडलं?
तब्बल अठरा वर्षांनी आयपीएलचे जेतेपद जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या चाहत्यांनी बंगळुरु शहरात मोठ्या उत्साहात विजयोत्सव साजरा केला. गुरुवारी, ५ जूनला चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीच्या विजयानंतर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र या आनंदाला दुःखाची किनार लागली, जेव्हा स्टेडियममध्ये खेळाडूंचा सत्कार सुरू असतानाच स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक जण जखमी झाले. अफवा आणि व्यवस्थेचा अभाव यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. यानंतर कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर तसेच व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\