मुंबई: राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीविषयी चर्चा रंगली असतानाच मंत्री नितेश राणे यांनी एक सूचक विधान करीत खळबळ उडवून दिली आहे. ‘उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलवारी करू शकतो’, असा दावा त्यांनी केला.
धाराशिव दौऱ्यावर असताना राणे यांनी शनिवार, दि. ७ जून रोजी माध्यमांशी संवाद साधला. मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी डिनो मोरियाच्या घरी पडलेल्या ईडीच्या धाडीविषयी विचारले असता राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलवारी करू शकतो. डिनो मोरिया प्रकरणात होणाऱ्या कारवाया आणि या एकंदर प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठीच ठाकरे बंधुच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू आहेत”, असेही त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याबात विचारले असता ते म्हणाले, एकाकडे २० आमदार आणि एकाकडे शून्य. यांची एवढी शक्ती आहे की, या शक्तीला आम्ही घाबरलो आहोत. आम्हाला घाम फुटला आहे, अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली आहे. तसेच हिंदुत्व सोडल्यामुळेच ठाकरे ब्रँड बुडाला, असेही ते म्हणाले.