लखनौ : (Safai Karmachari Bakri Eid) देशभरात बकरी ईदचा माहोल असतानाच उत्तर प्रदेशातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले की, यादिवशी कुर्बानी दिल्या जाणाऱ्या कुठल्याही प्राणांचे अवशेष उचलणार नाहीत. शाहजहांपूर जिल्ह्यातील या सफाई कर्मचाऱ्यांनी या संबंधी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, मुघल काळापासून सुरू असलेले हे काम त्यांच्या धार्मिक श्रद्धा आणि परंपरांच्या विरोधात आहे आणि आता त्यांना ही परंपरा पुढे नेण्याची इच्छा नाही.
हे वाचलंत का? : काँग्रेसच्या दुटप्पी धोरणांवर विष्णू शंकर जैन यांचा हल्लाबोल!
सफाई कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा एका विशिष्ट धर्माचा उत्सव आहे ज्यामध्ये ते सहभागी होऊ इच्छित नाहीत. त्यांच्या मते, हिंदू समुदायाचे लोक मुघल काळापासून हे काम करत आहेत, परंतु आता ते त्यांच्या धार्मिक श्रद्धेच्या विरुद्ध मानतात आणि या कारणास्तव ते आता हे काम करू इच्छित नाहीत. साधारण ८०% हिंदू कर्मचारी अशा नोकऱ्या करू इच्छित नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
पुढे ते असेही म्हणालेत की, जर त्यांना ही कामे करण्यासाठी दबाव आणला गेला तर ते सामूहिक संप करतील. त्यामुळे याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल. आता देश स्वतंत्र झाला असून प्रत्येकाला त्यांच्या धर्म आणि श्रद्धेने जगण्याचा संविधानिक अधिकार आहे. कुर्बानी दिलेल्या प्राण्याचे अवशेष उचलणे म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांसाठी एकप्रकारे मानसिक छळ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.