मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा सूत्रधाराला कॅनडामध्ये अटक करण्यात आली आहे. झीशान अख्तर उर्फ जस्सी पुरेवाल असे त्याचे नाव असून त्याला कॅनडाच्या सरे पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही.
१२ ऑक्टोबर २०२४ रोजी वांद्रे येथे बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्विकारली होती. बाबा सिद्दीकी हे बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या जवळचे असल्याने त्यांची हत्या केल्याचा दावा बिश्नोई गँगने केला होता.
दरम्यान, या हत्या प्रकरणाची चौकशी करताना मुंबई पोलिसांनी हत्येप्रकरणी झीशान अख्तरचे नावही समाविष्ट होते. त्याच्याविरुद्ध खून, दरोडा आणि खंडणीसारखे ११ गुन्हेही दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आता त्याला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानी डॉनच्या मदतीने परदेशात!
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवेळी झीशान अख्तर तिथेच होता आणि हत्येनंतर तो पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीच्या मदतीने परदेशात पळून गेला. हल्लेखोरांच्या गोळ्यांनी जर सिद्दीकी यांचा मृत्यू झाला नाही तर तो त्यांना स्वतः मारेल, असा त्याचा प्लॅन होता. त्यावेळी झीशान अख्तर लॉरेन्झचा भाऊ अनमोलशी फोनवर बोलत होता आणि गोळीबाराचे फोटो आणि व्हिडिओ पाठवत असल्याचीही माहिती पुढे आली आहे.