महावितरणचा २० वा वर्धापन दिन भांडुप परिमंडलात उत्साहाने साजरा

07 Jun 2025 16:35:49
 
Mahavitaran 20th anniversary celebrated with enthusiasm in Bhandup area
 
मुंबई: ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी व शेवटच्या ग्राहकापर्यंत वीज पुरवठा करण्यासाठी सक्षम वीज वितरण यंत्रणा उभारण्याचा व त्याची देखभाल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विलगीकरण करुन २००५ साली महानिर्मिती, महापारेषण व महावितरण कंपनी निर्माण करण्यात आल्या. दि. ६ जून २०२५ रोजी महावितरणच्या २० वा वर्धापन दिनानिमित्त भांडुप परिमंडल व ठाणे मंडळ कार्यालयाचे कार्यक्रम ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री.संजय पाटील सोबत ठाणे मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता श्री.युवराज मेश्राम, भांडुप परिमंडलाचे सहाय्यक महाव्यवस्थापक (वि व ले) श्री. प्रवीण रहांगदळे, सहाय्यक महाव्यवस्थापक (मा सं) सौ. नमिता गझदर व परिमंडल तसेच मंडळ कार्यालयातील इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 
यावर्षी वर्धापन दिन एका वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्यालयाने 'शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र' अशी एक वेगळी संकल्पना मांडली असुन दि. १ जून ते ६ जून २०२५ हे वीज सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला. दि. ६ जून रोजी वर्धापन दिन असल्यामुळे एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कर्मचाऱ्यांसोबत त्यांचे कुटुंबिय सुद्धा सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला दीप प्रज्वलन झाल्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरक्षा प्रतिज्ञा घेतली. यावेळी, मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला दिलेला विडिओ संदेश दाखविण्यात आला. त्यानंतर, दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले. तसेच, सुरक्षा सप्ताह दरम्यान झालेल्या स्पर्धाच्या विजेत्यांना सुद्धा प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले. व्यवस्थापक (मा सं ) सौ. रसिका भोले यांनी शिवराज्याभिषेक निमित्त शिवाजी महाराजांच्या शूर पराक्रमाबद्दल माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणे मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. युवराज मेश्राम यांनी केले. यावेळी बोलताना मुख्य अभियंता, श्री.संजय पाटील म्हणाले कि,"पुढच्या दहा वर्षात महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती होणार आहे व वीज एक मूलभूत गरज असून या क्रांतीमध्ये महावितरणची एक महत्वपूर्ण भूमिका असणार आहे.
 
ज्यामुळे, आपल्याला त्या दर्जेची सेवा देणे आवश्यक आहेच पण त्या सोबतच आपल्याला महावितरण एक ब्रांड म्हणून विकसित करायचा आहे. त्यासाठी आपल्याला अजून मेहनत करावी लागेल व मला खात्री आहे तुम्ही हे सिद्ध करून दाखवाल". महावितरणने केलेल्या मागील २० वर्षातल्या उत्तम कारगिरीबद्दल चित्रफीत दाखविण्यात आली. शेवटी, अशोक समेळ लिखित, दिग्दर्शक श्री. चंद्रमणी मेश्राम 'कुसुम मनोहर लेले' असा एक हृदयस्पर्शी नाटकाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. नाट्यगृहात महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते.
 
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मा. श्री. लोकेश चंद्र यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित करतानाची एक विडिओ क्लिप यावेळी दाखविण्यात आली. ज्यामध्ये त्यांनी येत्या काळात महावितरण पुढील आव्हाने व त्यांचा यशस्वीपणे सामना करण्याबाबत मार्गदर्शन केले. याशिवाय, ठाणे मंडळ कार्यालयाच्या इमारतीत आरोग्य शिबीरचे आयोजन करण्यात आले होते. कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा फायदा घेतला. या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ठाणे मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री.युवराज मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंते श्री.लक्ष्मण पिरवानी, श्री. सतीश जाधव, श्री. चंद्रमणी मेश्राम, श्री. माणिक राठोड, श्री. दत्तात्रय पवार, श्री. आप्पासो खांडेकर, व्यवस्थापक (मा सं) सौ. रसिका भोले यांनी विशेष मेहनत घेतली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ अभियंता, श्री. आदित्य जाधव व उच्चस्तर लिपिक सौ. केतकी मुळे यांनी केले.
 
वाशी मंडळ कार्यालयात सुद्धा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एक विशेष आकर्षण म्हणून श्री. समीर चौगुले यांच्या द्वारे 'सम्या सम्या मेहफिलीत माझ्या' हा एकपात्री प्रयोग. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त श्री. विनोद मेस्त्री यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री संजय पाटील यांनी कर्मचाऱ्यांचे विशेष मार्गदर्शन केले. वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकारी अभियंता व त्यांच्या चमू ने सुंदर नियोजन केले होते.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0