काय आहे सोशल मीडियावरचा ‘डस्टिंग चॅलेंज’? ज्यामुळे झाला इन्फ्लुएन्सरचा मृत्यू!

07 Jun 2025 16:58:49
Instagram dusting Challenge


अ‍ॅरिझोना : अमेरिकेतील ॲरिझोना राज्यातील १९ वर्षीय रेना ओ'रूर्के हिने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'डस्टिंग चॅलेंज'मध्ये भाग घेतला. या धोकादायक ट्रेंडमध्ये कीबोर्ड क्लिनिंग स्प्रेचा वास घेतला जातो. रेनाला हे करताना हृदयविकाराचा झटका आला आणि ती कोमात गेली. तीला लगेच उहचारांसाठी इस्पीतळात नेण्यात आले. चार दिवसांच्या उपचारांनंतर तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले.


रेनाचे वडील आरोन ओ'रूर्के यांनी सांगितले, "ती नेहमी म्हणायची, 'मी प्रसिद्ध होणार, बाबा.' पण हे प्रसिद्धीचे स्वप्न अशा पद्धतीने पूर्ण होईल, हे आम्हाला कधीच वाटले नव्हते." या ट्रेंडमध्ये वापरले जाणारे स्प्रे सहज उपलब्ध असतात, त्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची गरज नसते. यामुळे हा ट्रेंड किशोरवयीन मुलांमध्ये लोकप्रिय झाला आहे. रेनाच्या आईने डाना नावाच्या स्थानिक वृत्तपत्राला सांगितले, "हे स्प्रे स्वस्त आहेत, सहज मिळतात, आणि पालकांच्या ड्रग टेस्टमध्येही सापडत नाहीत.


डॉ. रँडी वीस्मन यांनी सांगितले की, "या स्प्रेचा वास घेतल्याने फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनची जागा घातक रसायने घेतात, ज्यामुळे यकृत निकामी होणे, हृदयविकार, आणि मृत्यू होऊ शकतो." रेनाच्या पालकांनी इतर पालकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, "मुलांच्या खोलीत काय आहे, यावर लक्ष ठेवा. त्यांच्याशी या गोष्टींबद्दल मोकळेपणाने बोला.


या घटनेनंतर, रेनाच्या कुटुंबाने 'Gofundme' या वेबसाइटवर एक मोहीम सुरू केली आहे, ज्याद्वारे ते इतरांना या धोकादायक ट्रेंडबद्दल जागरूक करत आहेत. डस्टिंग किंवा क्रोमिंग हे ट्रेंड किशोरवयीन मुलांमध्ये वाढत आहेत. या ट्रेंडमुळे आधीही अनेक तरुणांचे प्राण गेले आहेत. पालकांनी सतर्क राहणे, मुलांशी संवाद साधणे, आणि त्यांना या धोक्यांबद्दल माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे.रेनाच्या पालकांची इच्छा आहे की, त्यांच्या मुलीची कथा इतरांना सावध करेल आणि अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना टाळता येतील.


Powered By Sangraha 9.0