
वॉशिंग्टन डीसी : (Elon Musk hints at new political party amid feud with Donald Trump) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनामधून अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क बाहेर पडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यामध्ये वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. ट्रम्प आणि मस्क यांच्यातील एकेकाळचे घनिष्ठ मैत्रीचे संबंध आता उघड शत्रुत्वात बदलल्याचे दिसत आहे. दोघांमधील मतभेदांमुळे त्यांच्यात दुरावा आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्याशी सुरु असलेल्या वादानंतर आता इलॉन मस्क यांनी थेट राजकीय मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
हे वाचलंत का? - भारताची नारीशक्ती! जगातील सर्वात उंच रेल्वे पूल उभारणाऱ्या माधवी लता; १७ वर्षांच्या मेहनतीने करुन दाखवलं अशक्यही शक्य!
इलॉन मस्क यांनी नुकतीच एक्सवर एक पोस्ट शेअर केली असून त्या पोस्टमध्ये त्यांनी जनतेचा पोल घेतला आहे. त्यामध्ये मस्क यांनी असे म्हटले आहे की, "अमेरिकेत ८० टक्के मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करणारा एक नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची वेळ आली आहे का?". तसेच या प्रश्नावर अगदी ८० टक्के लोक सहमत असल्याचा दावाही त्यांनी पोस्टमध्ये केला आहे. याबरोबरच ही पोस्ट शेअर करत 'द अमेरिका पार्टी' असे सूचक नवीन नावही त्यांनी त्यात नमूद केले आहे. मस्क यांच्या या पोस्टमुळे ते नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत का? असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
"...तर ट्रम्प निवडणूक हरले असते"
डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत बोलताना इलॉन मस्क यांनी म्हटले होते की, "माझ्याशिवाय ट्रम्प निवडणूक हरले असते. डेमोक्रॅट्सना प्रतिनिधी सभेत बहुमत मिळाले असते", त्यांच्या या विधानानंतर अमेरिकत मोठी चर्चा झाली होती. त्यांच्या या विधानानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनीही प्रत्युत्तर देत मस्क यांचे सरकारी अनुदान आणि करार रद्द करण्याचा इशारा देत यापुढे आपल्याला मस्क यांच्याशी बोलण्यात विशेष स्वारस्य नसल्याचेही त्यांनी म्हटले.