शिक्षणाचे बाजारीकरण ही मुळात आज उद्भवलेली समस्या नसून, गेली वर्षानुवर्षे शैक्षणिक व्यवस्थेला या किडीने पोखरले आहे. दुर्दैवाने सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा या बाजारीकरणाच्या प्रक्रियेला रोखण्यात असमर्थ ठरलेल्या दिसतात. सुट्ट्या संपून जून महिना उजाडला की, पालकांना वेध लागतात ते मुलांसाठी शालोपयोगी वस्तूंच्या खरेदीचे. पण, त्याचीही पुन्हा काही शैक्षणिक संस्थांनी दुकानदारी मांडलेली दिसते. म्हणूनच प्रश्न पडतो की, या शैक्षणिक संस्था खरोखरचं ज्ञानमंदिरे आहेत की शिक्षणाची केवळ दुकानदारी करणार्या संस्था?
एक पालक आपल्या पाल्याला प्रवेश घेण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यांच्या कार्यालयात प्रवेश करताच मुख्याध्यापक विचारतात, "काय काम आहे?” त्यांचा प्रश्न ऐकल्यावर पालक म्हणतात, "माझ्या पाल्याला इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घ्यायचा आहे.” मुख्याध्यापक मानेने व डोळ्यांनी खुणावत पालकांना ‘बसा’ असा इशारा करतात. पालक बसतात आणि मुख्याध्यापक शाळेचे नियम सांगू लागतात. शाळेची वेळ, सहशालेय उपक्रमाविषयी सांगतात. शाळेचे शैक्षणिक शुल्क सांगतात. हे सारे ऐकताना पालकाचे डोळे आश्चर्यचकित भावनेने मुख्याध्यापकांकडे पाहात असतात. मुख्याध्यापक शाळेच्या गणवेशाबाबत माहिती देतात. "गणवेश आमच्याच शाळेत विकत घ्यावा लागेल,” असे सांगतात. "शाळेतच भोजनाची व्यवस्था आहे. त्याचे पैसे भरावे लागतील. शिकण्याची पुस्तके अमुक एका प्रकाशनाची विकत घ्यावी लागतील. ती पुस्तके शाळेत विक्रीला आहेतच आणि तीही येथेच विकत घ्यावी लागतील.” दप्तर आणि त्याचा रंग अमुक असला पाहिजे, बुट, सॉसच्या रंगाविषयी माहिती दिली. "तसेच हिवाळ्यासाठी अमुक एका रंगाचे स्वेटर खरेदी करावे लागेल. तेही शाळेत विक्रीसाठी उपलब्ध आहे. तेही येथेच विकत घ्यावे लागेल. पावसाळ्यासाठी लागणारी छत्रीदेखील पाल्याकडे असायला हवी. शाळेने छत्री विकायला ठेवली आहे. त्यासाठी तुम्हाला शाळेत पैसे मोजावे लागतील. सर्व विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सुविधा मिळाव्यात, म्हणून आम्हीच ते विकण्यास ठेवत आहोत. वह्यादेखील शाळेतच विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर घरून शाळेच्या आवारापर्यंत येण्यासाठी आवश्यक असणारी वाहनसुविधा शाळेने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी वेगळे पैसे शाळेकडे भरावे लागतील. शाळेत दरवर्षी विविध प्रकारचे उपक्रम साजरे केले जातात. स्नेहसंमेलन, सहली, क्षेत्रभेटी होतात. त्यासाठी लागणारी ड्रेपरी तुम्हाला आणावी लागेल. आम्ही ती शाळेमार्फतही उपलब्ध करून देतो. त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजावे लागतील.” एवढे ऐकल्यावर पालकाच्या मनात प्रश्न निर्माण झाला की, आपण शाळेत आलो की एखाद्या वस्तू विक्री केंद्रावर आलो आहोत! हे सारे ऐकल्यावर पालकाने धाडस करत मुख्याध्यापकांना प्रश्न विचारला, "मग माझ्या पाल्याच्या शिक्षणाचे काय?” तेव्हा मुख्याध्यापक म्हणाले, "त्यासाठी तुम्हाला बाहेर शिकवणीवर्ग लावावे लागतील. तेही कोठे लावावेत, यासंदर्भात आम्ही आपल्याला मार्गदर्शन करू.”
अशा आशयाचा एक विनोद समाजमाध्यमांवर फिरत होता. मात्र, हा विनोद वाचताना आपला प्रवास कोणत्या दिशेने सुरू झाला आहे, असा प्रश्न मनात निर्माण झाला होता. हा विनोद आहे की आमच्या शिक्षणव्यवस्थेचे वास्तव आहे? हेच आमच्या शिक्षणाचे वास्तव असेल, तर आपल्या शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने सुरू आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे, असे समजावे. शिक्षणाचा मूलभूत अर्थ जाणून न घेता, आपला प्रवास शिक्षणाच्या बाजारीकरणाकडे सुरू केला आहे, असेच म्हणावे लागेल.
शिक्षणाबाबत अलीकडे मध्यमवर्गीय अधिक चिंतेत आणि संवेदनशील आहेत. त्यांना आपल्या पाल्याच्या भविष्याच्या दृष्टीने अधिक काळजी वाटते. त्यांच्याकडे आता पैसा आहे. पाल्याच्या शिक्षणासाठी ते पैसे मोजण्यास तयार आहेत. पालक अगतिकतेत सापडला आहे. त्यांच्या अगतिकतेचा फायदा घेत शिक्षणाचा व्यापार करू पाहणारी वृत्ती समाजात दिवसेंदिवस फोफावत आहे. कधीकाळी कर्मवीरांसारखी माणसं शिक्षणातून माणूस घडेल, या देशातील गरिबांचे उत्थान घडेल, सर्वांची परिस्थिती बदलेल, यादृष्टीने शिक्षणाची वाट चालत शिक्षणसंस्था उभारणीसाठी प्रयत्न करत होते. त्यासाठी गावाकडून विद्यार्थी खांद्यावरून शाळेत आणले जात होती. त्या गावाकडच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठीच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणे, समाजातील धुरिणांनीदेखील त्यासाठी मदतीचा हात सातत्याने पुढे केला होता, अशा परिस्थितीत स्वातंत्र्यानंतर आपल्या शिक्षणाचा प्रवास सुरू होता. शाळा झाडाखाली सुरू केल्या जात होत्या. विद्यार्थ्यांसाठी माती हीच पाटी आणि काडी हीच पेन्सिल. आपल्या अवतीभोवती असलेला उघडा निसर्ग हाच अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम होता. विद्यार्थ्याचे जगणे आणि त्यातील दिसणारा बदल हेच मूल्यमापन. अशा परिस्थितीत मुले शिकत होती. या निसर्गाच्या उघड्या शाळेत विद्यार्थी अधिक चांगले शिकत होते. त्यांच्या शिक्षणाचा हा प्रवास अधिक गती देणारा आणि जीवन शिक्षणाच्या दिशेने घेऊन जाणारा होता. निसर्गासोबत शिकत असताना विवेक आणि शहाणपणाची वाट चालणे घडत होते. अशा शाळेत शिकलेली माणसंही आपल्या देशात कितीतरी मोठ्या पदावर पोहोचली आहेत. कर्मवीरांच्या शाळेत बॅरिस्टर पी. जी. पाटील यांच्यासारखे हजारो माणसं घडली. कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध नसताना शाळा सुरू होत्या. शिक्षणासाठी फारसा पैसा लागत नव्हता. चांगली शाळा म्हणजे जीवन शिक्षण देणारी, अनुभवाचे शिक्षण देणारी शाळा असे मानले जात होते. डॉ. अरविंद गुप्ता यांना आपल्या मुलीला चांगल्या शाळेत दाखल करायचे होते. तेही चांगल्या शाळेच्या शोधात होते. त्यांनी मुलीला घेऊन अनेक शाळा दाखवल्या. अनेक मुख्याध्यापकांशी ते बोलत होते. मुलगी शाळा पाहायची, आवडते की नाही हे सांगत होती. एका ठिकाणी मुख्याध्यापक म्हणाले की, "तुम्ही तुमच्या मुलीला तीन-चार दिवस शाळेत पाठवा. ती कशी आहे, ते आम्ही पाहू आणि मग शाळेत प्रवेश द्यायचा की नाही, ते ठरवू.” तेव्हा त्या मुलीचे पालक म्हणाले की, "हो, मी तिला तीन-चार दिवस शाळेत पाठवतो. पण, प्रवेश घ्यायचा की नाही, हे आम्ही ठरवू. तुमची शाळा तिला आवडली, तर प्रवेश घेऊ, अन्यथा नाही.” आज आपण शाळेत प्रवेश घेताना असा काही विचार करतो का, याचाही विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या आरंभीच्या काळात राजकीय नेतृत्व आणि गुरुजींची तळमळ, समाजाबद्दलचे प्रेम, विद्यार्थ्यांविषयी जिव्हाळा यातून शिक्षण घडत होते. नेतृत्वाला शिक्षणाचे मोल ज्ञात होते. आर्थिक परिस्थिती नव्हती; तर शिकण्याच्या प्रक्रियेचा विचार केला जात होता. ‘शिकणे’ हाच विचार केंद्रस्थानी होता. त्यामुळे मुलं घडत होती. शिकणे शहाणपण आणि विवेकाशी जोडलेले होते. कोणत्याही प्रकारची प्रतिष्ठा शिक्षण सुविधांशी जोडलेली नव्हती. तुम्ही कोठे शिकता, याला महत्त्व नव्हते, तर तुम्ही काय शिकता, हेच महत्त्वाचे ठरत होते. आज मात्र शिकण्यापेक्षा शाळांच्या इमारती, तेथील भौतिक सुविधांना अधिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. त्यामुळे शिक्षणाच्या बाजारीकरणाचा वेग वाढला आहे. गेल्या काही वर्षांत मध्यमवर्गीयांची संख्या उंचावत आहे. खालच्या स्तरावरून वरच्या स्तरावर आलेल्या मध्यमवर्गीयांनी शिक्षणाचे मोल लक्षात आल्याने ते हवे तितके पैसे मोजू पाहात आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून परिस्थिती बदलू शकते, हा विश्वास त्यांना असल्याने त्यांनी आपल्या पाल्याच्या चांगल्या शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालय निवडण्यावर अधिक भर आहे. मात्र, चांगले शिक्षण, चांगल्या शाळा म्हणजे नेमके काय, याचा विचार करायला हवा. आज चांगल्या शिक्षणाची व्याख्या बदलत चालली आहे. चांगली शाळा म्हणजे आकाशाला गवसणी घालणारी, रंगरंगोटी असलेली इमारत, विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी बसेची सुविधा, उत्तम भोजन व्यवस्था, शाळेत एसी सुविधा, पिण्याचे फिल्टरचे पाणी, बसण्यासाठी अत्यंत उत्तम दर्जाची बाके, अधिक उत्तम स्वरूपाची फर्निचर सुविधा या सार्या गोष्टी म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण झाले आहे. अशा अत्यंत श्रीमंत शाळेत पाल्य शिकला की विद्यार्थी अधिक ज्ञानसंपन्न होतो, असे मानले जाते का? याचाही शोध घेण्याची वेळ आली आहे. या उंचावलेल्या भौतिक सुविधामुळे शाळेचे शैक्षणिक शुल्क लाखोंच्या घरात पोहोचले आहे. अगदी बालवाटिकेचे प्रवेश शुल्कदेखील आता ५० हजारांवर पोहोचले आहे. दहावीपर्यंतचा खर्च आता दहा ते १५ लाखांवर पोहोचला आहे. आपल्याला पाल्याला गरिबीचा चटका बसू नये, असे वाटते, म्हणून पालक रात्रीचा दिवस करत, दोघेही नवरा-बायको नोकरी करत, पोटाला चिमटा घेत मुलांच्या शिक्षणासाठी पैसा मोजत आहेत. कारण, शिक्षण हा जसा व्यक्तिगत उन्नतीचा मार्ग आहे, त्याप्रमाणे शिक्षण हा व्यक्तिगत प्रतिष्ठेचा मार्ग बनला आहे.
जागतिकीकरण, उदारीकरण, मुक्त अर्थव्यवस्था, खासगीकरणाने शिक्षणाचा पूर्ण अर्थच बदलून टाकला आहे. शिक्षण हे राष्ट्रनिर्मितीचे साधन न राहता, त्याचाही धंदा झाला आहे. शिक्षणाचा बाजार होत असल्याने नफा मिळवण्यासाठी शिक्षणसंस्था उभ्या राहात आहेत. शिक्षणातून माणूस घडवण्याऐवजी पैसा मिळवण्यासाठीचे साधन बनल्याने त्याचे अत्यंत दुष्परिणाम समाजाला आता भोगावे लागत आहेत. बाजारीकरणामुळे शिक्षणातील ज्ञान प्रतिष्ठित होण्याऐवजी इमारती, माध्यमांना महत्त्व आले आहे. त्याचा परिणाम म्हणून वर्तमानात ज्ञानसंपन्न, समर्पण, विवेकी, शहाणपणाची वाट चालणारी माणसं महत्त्वाची वाटेनाशी झाली आहेत. त्याऐवजी शिक्षणात होणारे श्रीमंतीचे दर्शन हेच शिक्षण झाले आहे. त्यामुळे शिक्षणातून आपण ज्ञानाची वाट चालण्याऐवजी केवळ माहितीची वाट चालू लागलो आहोत. समाजहितापेक्षा स्वकेंद्री विचार महत्त्वाचा ठरू लागला आहे. स्वार्थकेंद्रित व्यवस्था शिक्षणातून उभ्या राहत आहेत. शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे शिक्षणात विषमतेची बिजे पेरली जात आहेत. ही बिजे समाजातही प्रतिबिंबित होत आहेत. अतिगरीब, गरीब, मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय ही समाजातील असणारी आर्थिक विषमता शाळांमध्येही दिसत आहे. गरिबांच्या शाळा आणि श्रीमंतांच्या शाळा यासंदर्भाने असलेले अंतर डोळ्यांत न मावणारे आहे. त्यामुळे शिक्षणाचे बाजारीकरण आणि नफेखोरी यासंदर्भाने विचार करण्याची वेळ आली आहे. शिक्षणाचा मूलभूत अर्थाचा विचार न करता, ‘खाऊजा’ संस्कृतीत केवळ धंदा आणि नफा महत्त्वाचा ठरत आहे. त्यातून शाळांचा प्रवास मुख्य ध्येय, उद्दिष्टांपासून दूर जात आहे. त्यामुळे शिक्षण हे ज्ञानमंदिर न राहता, दुकानदारी करण्याच्या दिशेने प्रवास करू लागले आहे. हे वास्तव लक्षात घेऊन पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.
संदीप वाकचौरे