जम्मू-काश्मीर : (PM Modi inaugurates Chenab Bridge) जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर तयार करण्यात आला आहे. या पूलामुळे काश्मीरचे खोरे देशाच्या इतर भागांशी जोडले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच असलेल्या या चिनाब पुलाचे शुक्रवारी ६ जून रोजी उद्घाटन केले आहे. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव देखील उपस्थित होते. तसेच कटरा रेल्वे स्थानकावरून कटरा आणि श्रीनगरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवून उधमपूर-कटरा-श्रीनगर-बारामुल्ला या रेल्वे मार्गाचे लोकार्पण केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातल्या सर्वात उंच असलेल्या चिनाब रेल्वे पूलावर तिरंगा फडकवला. या रेल्वे पूलाची निर्मिती ही भारताच्या विकासातील एक महत्वाचा क्षण मानला जात आहे. चिनाब नदीवर या पूलाचे बांधकाम हे सर्वात मोठे आव्हान मानले जात होते. मात्र, हे आव्हान पूर्ण करत काही महिन्यांपूर्वी या पूलावरून रेल्वेची पहिली यशस्वी चाचणी पार पडली होती. २२ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हे स्वप्न साकार झाले आहे.हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवर पेक्षा ३५ मीटर जास्त उंच आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला हा रेल्वे मार्ग २७२ किमीचा आहे. या रेल्वे मार्गावर ३६ बोगदे आहेत, ज्यांची लांबी ११९ किमी आहे. रेल्वे मार्गावर ९४३ रेल्वे पूल आहेत.
कटरा रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी शालेय मुलांशी संवाद साधला. त्यांनी ट्रेनमध्ये असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जम्मू आणि श्रीनगर रेल्वे मार्गावर बनलेल्या चिनाब ब्रिजला एक इंजिनीअरिंग मार्बल म्हटले आहे. या पुलाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलताना ते म्हणाले की, "याचे डिझाइन खूप किचकट आहे आणि त्याचे फाउंडेशन अर्ध्या फुटबॉल मैदानाएवढे आहे आणि त्यात ३०,००० टन स्टील लागले आहे." तसेच, ते म्हणाले की "हा जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे."