ISI एजंट ‘मॅडम एन’ नक्की आहे कोण? पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणात नवा खुलासा!

06 Jun 2025 19:25:37

how madam n lured indian social media influencers to spy for pakistan 
 
नवी दिल्ली : (Who is Madam N) पाकिस्तानसाठी हेरगिरी आणि भारताविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्रावर कारवाई सुरू असतानाच, या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. भारतीय इन्फ्लुएन्सर्सना पाकिस्तानात सहज प्रवेश मिळवून देणाऱ्या आणि 'आयएसआय'च्या सहाय्याने गुप्त नेटवर्क तयार करणाऱ्या एका महिलेचे नाव समोर आले आहे. नोशाबा शहजाद असं तिचं नाव असून ती ‘जय्याना ट्रॅव्हल अँड टुरिझम’ या ट्रॅव्हल एजन्सीची मालक आहे आणि पाकिस्तानमधील एक प्रसिद्ध व्यावसायिक मानली जाते.
 
माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार, शहजाद पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) अंतर्गत काम करते. 'आयएसआय'मध्ये ‘मॅडम एन’ या सांकेतिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या शहजादने ज्योती मल्होत्रासारख्या भारतीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पाकिस्तानात प्रवास करण्यासाठी मदत केली. याचबरोबर तिला गुप्त नेटवर्क तयार करण्यासाठी विशेष जबाबदाऱ्या दिल्या होत्या.
 
ज्योती मल्‌होत्राची चौकशी सुरू असताना भारतात गुप्तपणे किमान ५०० हेर कार्यरत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली. त्यांना स्लीपर सेल नेटवर्कच्या नियोजनात शहजादची महत्त्वाची भूमिका आहे. भारतीय इन्फ्लुअन्सर्सचा वापर करून पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने ऑपरेशन आखले होते, असेही म्हटले जात आहे. यामध्ये शहजादला हे गुप्त नेटवर्क स्थापित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. शहजादचा पती निवृत्त पाकिस्तानी नागरी सेवा अधिकारी असल्यामुळे तिचे राज्य यंत्रणेशी चांगले संबंध आहेत.
 
शहजादने भारतीय सोशल मीडियावरील अनेक व्यक्तींना पाकिस्तानी लष्करी आणि गुप्तचर संस्थांशी जोडले असून, विशेषतः भारतीय हिंदू आणि शीख समुदायाला लक्ष्य केले आहे. गेल्या सहा महिन्यांत तिने जवळजवळ ३,००० भारतीय आणि १,५०० एनआरआयना पाकिस्तानला भेट देण्यास मदत केली आहे. दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासातील व्हिसा विभागाशी तिला विशेष संपर्क होता. तिने प्रमुख अधिकाऱ्यांसोबत जवळचे संबंध प्रस्थापित करून एका फोनवर पाकिस्तानी व्हिसा मिळवण्याची व्यवस्था केली होती.
 
Powered By Sangraha 9.0