नागपूर : बकरी ईदच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर गोवंश तस्करी होत असल्याने तस्करांना जेरबंद करा असे आदेश पालकमंत्री व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांना दिल्याने जुनी कामठी भागात पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत 238 गोवंशीय प्राण्यांची सुटका करण्यात आली. विशेष म्हणजे, सुमारे 24 लाखांच्या मुद्देमालासह तस्करांनी टोळी जेरबंद करण्यात आली.
जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा या कारवाईनंतर सतर्क झाली असून, गोवंश तस्करांच्या मुसक्या आवळणे सुरू केले आहे. बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या होऊ नये यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांना कडक कारवाई चे आदेश दिले होते. त्यामुळे पोलीस अलर्ट मोडवर होते. काल रात्री माहितीच्या आधारे पोलिसांनी जुनी कामठी परिसरातील एका गोडाऊन मध्ये छापा टाकला. यावेळी 238 गोवंश त्याठिकाणी मरणासन्न अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी या सर्व गोवंश ची सुटका केली. या प्राण्यांची एकूण किंमत सुमारे 23,80,000 रुपये आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गोडाऊन मालक आणि घरमालक नब्बु वजीर कुरेशी, साजिद कुतुब कुरेशी, जुबेर अल्ताब कुरेशी, फैय्याज सत्तार कुरेशी, आसिफ कुरेशी आणि त्यांना मदत करणाऱ्या इतर व्यक्तींवर गोवंशीय प्राण्यांची अवैध कत्तली करण्याचा आरोप खाली आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून ताब्यात घेतले आहे.