मनसे-उबाठा यूतीवर उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया! म्हणाले, "थेट बातमीच..."
06-Jun-2025
Total Views |
मुंबई : राज्यभरात सध्या मनसे आणि उबाठा गटाच्या यूतीबाबत चर्चा सुरु असताना आता उद्धव ठाकरेंनीदेखील आपले मौन सोडले आहे. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंसोबतच्या यूतीबाबत संकेत दिले आहेत.
शुक्रवार, ६ जून रोजी शिवसेनेच्या नेत्या सुजाता शिंगाडे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उबाठा गटात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, यावेळी त्यांना यूतीबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, "जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. संदेश कशाला मी तुम्हाला बातमीच देईल. माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही. त्यांचेसुद्धा सैनिक आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्या मनातही संभ्रम नाही. त्यामुळे संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काही बातमी द्यायची ती देऊ," असे ते म्हणाले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत मनसे आणि उबाठा गटाची यूती होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावर बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, "राजसाहेब ठाकरे या सगळ्याबाबत निर्णय घेतील. ज्यावेळी एखादी ठोस गोष्ट होईल, ज्यावेळी ठोस प्रस्ताव येईल त्यावर राजसाहेब योग्य तो निर्णय घेतील. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात २०१४ आणि २०१७ ला सुद्धा काहीतरी होते. पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. जनतेच्या मनात काय आहे हे आम्हाला माहिती आहे."
मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने उबाठा गटात प्रवेश केला. यावर बोलताना ते पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंना त्यांचे पदाधिकारी फसवतात. मनसेचा पदाधिकारी फोडून आणला आहे असे सांगून ते त्यांना फसवत आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून एकदा तपासावे. पक्षप्रवेश करणारा हा आमचा पदाधिकारी नाही. २०१४ ला हा पदाधिकारी होता. त्याची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर २०१४ ते २०२५ तो मनसेच्या बॅनरवरही नाही आणि कुठल्या पदावरही नाही. याऊलट तो एक बदनाम व्यक्ती असून त्याच्यावर ३५४ सारख्या केसेले पडल्या आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून एकदा तपासून घ्यावे," असे ते म्हणाले.