डोंबिवली : डोंबिवलीतील मानपाडा रोडवरील शहर मध्यवर्ती शाखेसमोर शिवरायांच्या नूतनीकरण केलेल्या पुतळ्य़ांचे गुरूवारी अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे राजधानी रायगडावर असलेल्या मेघडंबरीमधील शिवछत्रपतीचे आकर्षक गादीवर बसलेले हुबेहुबे रूप साकारण्यात आले आहे.
छत्रपती शिवराज्याभिषकाच्या पूर्वसंध्येला हा लोकार्पण सोहळा पार पडला. शिवगजर्ना, ढोल-ताशा, लेझीम, घोडेनृत्य अशा वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. रायगडमधील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांचे हुबेहुब रुपांचे दर्शन घेण्यासाठी शिवप्रेमींनी गर्दी केली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून छत्रपतीच्या मेघडंबरीमधील पुतळा साकारण्यात आला आहे. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण, केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, शिवसेना आमदार राजेश मोरे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार जगन्नाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, सांस्कृतिक नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळयाच्या नुतनीकरणाचे लोर्कापण झाले आहे. याठिकाणी 1976 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धीकृती पुतळा काही दानशूर व्यक्तींनी एकत्र येऊन बसविला होता. मेघडंबरीसह छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा अशी नागरिकांची मागणी होती. त्यानुसार राज्यसरकार आणि महापालिकेच्या निधीतून हा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अश्वरूढ असा छत्रपतीचा पुतळा बसविण्यात आला होता. कल्याण डोंबिवलीत कॉक्रीटीकरणाचे रस्ते, मेट्रो, कल्याण शीळ रोड, लोकोपयोगी वस्तू उभ्या राहत आहे. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा याठिकाणी बसविण्यात आला आहे असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार व्यक्त केले.
डोंबिवली शहर ही शिवभक्तांची नगरी - रविंद्र चव्हाण
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दिशादर्शक आणि प्रेरणादायी विचारांचे संस्कार आपल्या डोंबिवली शहराच्या मातीतच आहेत. येथील आबालवृध्द डोंबिवलीकर हे शिवभक्त असून शिवछत्रपतींच्या हिंदवी शिकवणीतून हिंदू संस्कृती आणि परांपरांचे जतन व संवर्धन करण्यात कायमच अग्रेसर राहिले आहेत, अशा शिवभक्त नगरीचा लोकप्रतिनिधी असल्याचा सार्थ अभिमान आहे असे मत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.