मुंबई: दै. ‘मुंबई तरुण भारत’ आयोजित आणि ‘एसएफसी एनव्हायर्नमेंटल टेक्नोलॉजीज’ प्रस्तुत ‘स्पिसीज अॅण्ड हॅबीटॅट्स वॉरियर्स अॅवॉर्ड-2025’ हा पुरस्कार सोहळा गुरुवार, दि. 5 जून रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे मान्यवर आणि निसर्गप्रेमींच्या उपस्थितीत अत्यंत दिमाखात पार पडला. ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘योगायतन पोर्ट ग्रुप’ हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, मत्स्य व्यवसाय व बंदरेमंत्री नितेश राणे यांनी यावेळेस वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनासाठी काम करणार्या संशोधकांचा सन्मान केला.
महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी दृकश्राव्य माध्यमातून कार्यक्रमातील पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या.जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत दै. ‘मुंबई तरुण भारत’ आयोजित या सोहळ्यात विविध लोककला आविष्कारांच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण, संवर्धन याविषयक विविध नाट्य आणि संगीतातून प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला.
यावेळी ‘श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास’चे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, अभिनेत्री उर्मिला कानेटकर, ‘पॉलिसी अॅण्ड अॅडव्होकेसी रिसर्च सेंटर’चे संचालक विक्रम शंकरनारायन, ‘एसएफसी एन्हायर्नमेंटल टेक्नोलॉजीज’चे एक्सिक्युटीव्ह डायरेक्टर सर्वेश गर्ग आणि कार्यकारी संचालक प्रचिती आसोलकर, सीईओ मंदार देसाई यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनविशेष पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले. दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार यांनी या पुरस्कारामागची भूमिका मांडली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनासाठी काम करणार्या व्यक्तींसह जनसमूहाचा सत्कार करण्यात आला. एकूण 11 श्रेणींमध्ये 15 व्यक्ती आणि संस्थांना ‘स्पिसीज अॅण्ड हॅबीटॅट्स वॉरियर्स अॅवॉर्ड -2025’ प्रदान करण्यात आला.
निसर्गसेवकांच्या कार्याला सलाम!
दै. ‘मुंबई तरुण भारत’ आयोजित सन्मान सोहळा अत्यंत महत्त्वाचा आहे. पर्यावरणासाठी काम करणारे योद्धे हे साक्षात ईश्वराचे रूप आहेत. त्यांच्या या अतुलनीय निसर्ग सेवेला माझा सलाम! मला या सर्व निसर्गसेवकांमध्ये ईश्वराचा अंश दिसतो. महाराष्ट्राच्या मातीतील संतांनी आपल्या वचनांमधून जी संवेदनशीलता मांडली, त्याचेच दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. संत ज्ञानेश्वरांनी म्हटले होते की, ‘विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले.’ हा आपलेपणा ज्यांनी आपल्या कार्यातून जपला आहे, अशा या निसर्गयोद्ध्यांची ओळख आपल्या सर्वांना होणे अत्यंत गरजेचे आहे.
- अॅड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री
तरुणांसाठी हे व्यासपीठ काळाची गरज!
दै. ‘मुंबई तरुण भारत’ने अत्यंत विचारपूर्वक पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धन याविषयी काम करणार्या संशोधकांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. तरुणांना अशा प्रकारचे व्यासपीठ मिळणे ही काळाची गरज आहे. आजमितीला पर्यावरण आणि विकास या दोन्ही गोष्टींचा समतोल साधत आपल्याला पुढे जायचे आहे. पर्यावरणाशी निगडित असणारी आव्हाने नजरेसमोर ठेवून विकासाची पायाभरणी करायची आहे. महाराष्ट्राच्या विकासाची दिशा ठरवताना, पर्यावरणाशी निगडित समस्यांना कसे तोंड देणार आहोत, या दृष्टीने काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे या पुरस्काराला आणि पुरस्कारार्थींना विशेष महत्त्व प्राप्त होते.
- नितेश राणे, मत्स्य व्यवसाय व बंदरेमंत्री
तरुणांच्या भगीरथ प्रयत्नांचा सन्मान!
या कार्यक्रमाला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद प्रेरणादायी आहे. जैवविविधतेसाठी काम करणार्या लोकांचे हक्काचे व्यासपीठ तयार व्हावे, या विचाराने या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. प्रगतीच्या वाटेवर चालणार्या आपल्या नव्या भारतासमोर पर्यावरणाच्या दृष्टीने नवीन आव्हानेसुद्धा आहेत. या समस्यांवर काम करणार्या तरुण संशोधकांचा सन्मान करण्यात यावा, परस्परांच्या कार्याला हातभार लावण्यात यावा, यासाठी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या तरुण संशोधकांच्या कार्याची ज्यावेळेस आपल्याला ओळख होते, तेव्हा भगीरथ प्रयत्न म्हणजे नक्की काय, याची प्रचिती येते. जैवविविधतेच्या संवर्धनाच्या कार्यासाठी समोर आलेले मदतीचे हातसुद्धा त्या परिवर्तनाच्या वाटचालीचे महत्त्वाचे द्योतक आहेत.
- किरण शेलार, संपादक दै. ‘मुंबई तरुण भारत’