काँग्रेसला धक्का! माजी मंत्र्यांचा शिवसेनेत प्रवेश
06-Jun-2025
Total Views |
सोलापूर : माजी मंत्री तथा काँग्रेसचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गुरुवार, ६ जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार राजू खरे, माजी आमदार शहाजी बापू पाटील, ज्ञानराज चौगुले, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख मनिष काळजे, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधू शंकर म्हेत्रे ही राम लक्ष्मणाची जोडी असून म्हेत्रे परिवाराला मोठी सामाजिक पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडिल सातलिंग्गपा म्हेत्रे हे या परिसरातील एक मोठे प्रस्थ होते. म्हेत्रे परिवाराने कधी जात, धर्म, पक्ष न बघता येथील स्थानिक नागरिकांची प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आज सिध्दारामजी यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे. जिथे दिशा नाही तिथे दशा झाली. सिध्दाराम म्हेत्रे अनुभवी आहेत, त्यामुळे ते आता शिवसेनेत आल्याने आता सोलापूर, अक्कलकोट, दुधनीचे भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.