उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये यूतीसाठी फोन? काय म्हणाले संजय राऊत?
06-Jun-2025
Total Views |
मुंबई : राज्यभरात सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या यूतीबाबत चर्चा सुरु असताना आता संजय राऊतांच्या एका विधानाने चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियाला सांगून कुणी फोन करत नाही. कदाचित त्यांच्यात फोन झालेसुद्धा असतील, असे वक्तव्य राऊतांनी केले आहे. त्यामुळे आता ठाकरे बंधूंची यूती होणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
संजय राऊत मनसेशी यूती करण्याबाबत दररोज सकारात्मक असल्याचा पुनरुच्चार करत आहेत. परंतू, मनसेकडून याबाबत अद्याप कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच यूतीबाबत बोलणी करण्यासाठी उबाठा गटाने राज ठाकरेंना फोन करावा, असे वक्तव्य अमित ठाकरेंनी केले होते.
यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या जन्माच्या आधीपासूनच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भाऊ आहेत. मी त्या दोघांनाही पाहिले आहे. मी दहा मिनिटांनी उद्धव ठाकरेंना किंवा राज ठाकरेंना फोन करतो असे सोशल मीडियाला सांगून कुणी फोन करत नाही. फोन झालेसुद्धा असतील. काय सांगावे? तुम्हाला फळ दिसण्याशी कारण आहे. फळ दिसण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून लवकरच तुम्हाला फळ दिसेल," असे ते म्हणाले. तसेच दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नसते, असेही ते म्हणाले.
...म्हणून कार्यकर्ते सकारात्मक!
"नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळेच कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. आम्ही सकारात्मक आहोत. राज ठाकरे आणि त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम जर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे," असेही संजय राऊत म्हणाले.