रोज सकाळी ९ वाजता भोंगा वाजवणाऱ्यांनी प्रस्ताव तयार करावा! संदीप देशपांडेंचा खोचक टोला
06-Jun-2025
Total Views |
मुंबई : रोज सकाळी ९ वाजता भोंगा वाजवणाऱ्यांनी यूतीचा प्रस्ताव तयार करावा, असा खोचक टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांचे नाव न घेता लगावला आहे. राज्यभरात सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असून राजकीय वर्तुळातून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
याबद्दल माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, "राजसाहेबांनी महेश मांजरेकर यांना जो पॉडकास्ट दिला त्यात महाराष्ट्राच्या प्रश्नांवर सर्व मराठी माणसांनी एकत्र यावे, असे त्यांना अपेक्षित होते. त्याप्रमाणे मराठी माणसे एकत्र येत असून त्याचा आनंद आहे," असे ते म्हणाले.
त्यानंतर त्यांना यूतीच्या प्रस्तावाबाबत विचारले असता ते म्हणाले की, "रोज सकाळी ९ वाजता कोण भोंगा वाजवतोय? ते भोंगा वाजवत आहेत. त्यामुळे त्यांनीच प्रस्ताव तयार करावा. आमच्यात आणि त्यांच्यात यूतीबाबत कोणतीही चर्चा सुरु नाही, हे मी पक्षाचा नेता म्हणून अत्यंत जबाबदारीने सांगत आहे," असेही संदीप देशपांडे म्हणाले.
महापालिका निवडणूकांसाठी आमचे नेते मैदानात!
ते पुढे म्हणाले की, "महापालिका निवडणूकांसाठी आमचे सगळेच नेते मैदानात आहेत. सगळेजण काम करत आहेत. अमित ठाकरे आमच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष आहेत. ते सगळीकडे फिरत आहेत, बैठका घेत आहेत. शाखाध्यक्षांची मने जाणून घेत पुढे काय करायचे याची रणनिती आखत आहेत," असेही त्यांनी सांगितले.