एकल प्लास्टिक टाळा, कापडी पिशव्या वापरा! मंत्री पंकजा मुंडेंचे आवाहन
मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली एकल प्लास्टिक न वापरण्याची शपथ
06-Jun-2025
Total Views |
मुंबई : मंत्रालयातील प्रत्येक विभाग एकल प्लास्टिक मुक्त झाला पाहिजे यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे गुरुवार, ५ जून रोजी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित विशेष कार्यक्रमात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकल प्लास्टिक सोडून कापडी पिशव्या वापरण्याची शपथ घेतली.
यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, पशुसंवर्धन विभागाच्या प्रधान सचिव एन. रामास्वामी, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल, पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज इत्यादी उपस्थित होते.
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्यासाठी मंत्रालयात प्रथमच अशी प्लास्टिक निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली असू यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः तयार केलेली एकल प्लास्टिक टाळण्याची शपथ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिली. तसेच त्यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कापडी पिशव्यांचे वाटपही केले.
पर्यावरणाला 'हो', प्लास्टिकला 'नो'!
यावेळी बोलताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, "पर्यावरण संरक्षण हा एक महत्त्वाकांक्षी विषय आहे आणि आपण सर्वांनी त्याबद्दल आसक्ती बाळगली पाहिजे. सरकारी आणि खाजगी कार्यालयांमध्ये कागदाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे मंत्रालयाचे कामकाज कागदविरहित करणे यादृष्टीने पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने पहिले पाऊल उचलायला हवे. संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरणाबद्दल जागरूकता पसरवणे हे आपले उद्दिष्ट आहे. आपण कागद आणि प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. प्लास्टिक पिशव्यांपेक्षा कापडी पिशव्या वापरायला हव्या. त्यासाठी 'पर्यावरणाला 'हो' आणि प्लास्टिकला 'नो' म्हणून पर्यावरण संरक्षणाची शपथ घेऊया," असे आवाहन त्यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रात एकल प्लास्टिक मुक्तीचा संदेश द्या!
याप्रसंगी मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या की, "मंत्रालयात राबवण्यात येणारी ही पर्यावरण संरक्षण मोहीम केवळ एक उपक्रम नसून एक सार्वजनिक संदेश आहे. या माध्यमातून आपण आपला परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत जागरूकता पसरवत आहोत. पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपण आपल्या कुटुंबाला, सहकाऱ्यांना आणि मित्रांना पर्यावरण संरक्षणासाठीच्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली पाहिजे. कागद आणि प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालून या मोहिमेची सुरुवात करा. मंत्रालयात सुमारे साडेनऊ हजार कर्मचारी कार्यरत आहेत आणि आपण सर्वांनी मिळून संपूर्ण महाराष्ट्रात या प्लास्टिक मुक्त मोहिमेचा संदेश पसरवला पाहिजे. 'माझे कार्यालय, माझे घर-प्लास्टिक मुक्त आणि पर्यावरणपूरक' ही केवळ एक घोषणा राहू नये, तर त्याच्या अंमलबजावणीसाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. प्लास्टिक मुक्त मंत्रालयाची प्रतिज्ञा घेऊन, सर्वांनी कागदाचा वापर टाळावा आणि कागदविरहित प्रणाली स्वीकारावी," असे आवाहन त्यांनी केले.