महायुतीची गाडी महाराष्ट्राच्या विकासपथावर

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शुभहस्ते समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण

    06-Jun-2025
Total Views |
 
Mahayuti on Maharashtra development
 
मुंबई: “आम्हाला एकमेकांच्या गाडीत बसण्याची सवय आहे. ड्रायव्हिंगचीही सवय आहे. त्यामुळे आमची गाडी एकदम छान चालली आहे. आम्ही तिघेही तीन शिफ्टमध्ये ती चालवतो. महायुतीची गाडी महाराष्ट्राच्या विकासपथावर एकदम सुसाट आहे,” असे विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमधील इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमणेपर्यंतच्या 76 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन झाले. याचबरोबर सायन-पनवेल महामार्गावरील तिसर्‍या ठाणे खाडी पुलाच्या (दक्षिण वाहिनी)देखील लोकार्पणाचा कार्यक्रम दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाला.
 
या कार्यक्रमाला शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय्यमंत्री नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम (सा.उ.) राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आ. निरंजन डावखरे, आ. नितीन पवार, आ. सरोज अहिरे, आ. हिरामण खोसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’चे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.
 
मराठवाड्यातील आर्थिक चित्र बदलणार
 
“महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करा, असे वन विभागाला सांगितले आहे. या मार्गात आपण एक हजार शेततळी तयार केली आहेत. 22 ठिकाणी सुविधा केंद्र तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा मार्ग पूर्णतः अपघातमुक्त कसा होईल, यासाठी आपण प्रयत्न करत आहोत,” असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, “आगामी काळात शक्तिपीठ महामार्ग साकारण्यात येणार आहे. या महामार्गामुळे मराठवाड्यातील आर्थिक चित्र बदलण्यास मदत होईल,” असेही फडणवीस म्हणाले.
 
कृषी, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला चालना
 
पुढे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “701 किमीचा हा देशातील आणि महाराष्ट्रातील गेम चेंजर प्रकल्प आहे. संपूर्ण महामार्गाचा हा सर्वांत कठीण टप्पा होता. हा प्रकल्प होणार नाही, असे काहींना वाटत होते किंवा होऊन नये यासाठी प्रयत्न करत होते. दहा जिल्हे प्रत्यक्ष आणि 14 अप्रत्यक्ष जिल्हे जोडले गेले. प्रवासाला लागणारे 18 तासांत आता आठ तास लागणार आहेत. कृषी समृद्धी केंद्र होत आहे. कृषी, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला चालना देणारा ठरेल. या मार्गामुळे नाशिकच्या विकासाला चालना मिळेल,” असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
 
स्पीडवर माझे बारकाईने लक्ष
 
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “यंदाच्या वर्षी आम्ही दहा कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी 25 कोटी म्हणजे पंचवार्षिक योजनेत 100 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘समृद्धी महामार्ग’ हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले आणि प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण ही आता त्यांनीच केले, असे फार क्वचित पाहायला मिळते. मार्गावर जाताना गाडीच सारथ्य एकनाथ शिंदे यांनी केले, तर येताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडी चालविली. स्पीडवर माझे बारकाईने लक्ष होते आणि सुरक्षित आम्ही पोहोचलो. तुम्हीसुद्धा असाच सुरक्षित प्रवास करा,” असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल शैलीत संवाद साधला.
 
महामार्गाची घोषणा ते प्रकल्पपूर्ती
 
देवेंद्र फडणवीस यांनी दि. 31 ऑक्टोबर 2014 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दि. 31 जुलै 2015 रोजी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस-वे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली. दि. 18 डिसेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर 520 किमी या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 11 डिसेंबर 2022 रोजी उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने 625 किमीचा महामार्ग नागरिकांसाठी खुला झाला. यावरून तब्बल दोन कोटी वाहनधारकांनी प्रवास केला आहे. गुरुवार, दि. 5 जून रोजी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ अंतिम टप्प्यातील 76 किमी मार्गाच्या लोकार्पणासह 701 किमीचा संपूर्ण मार्ग खुला झाला आहे. या मार्गाची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केली; तर आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करून हा प्रकल्प मुख्यमंत्री म्हणून लोकार्पण करण्याचा इतिहास त्यांनी आपल्या नावावर नोंदविला.