नवी दिल्ली: ‘उमीद’ पोर्टल भारतातील वक्फ मालमत्ता व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडेल. यामुळे केवळ पारदर्शकता येणार नाही तर सामान्य मुस्लिमांना विशेषतः महिला आणि मुलांनाही मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शुक्रवारी पोर्टले उद्घाटन करताना केले.
‘उमीद’ सेंट्रल पोर्टल हे केवळ तांत्रिक सुधारणा नसून ते एक ऐतिहासिक पाऊल आहे. अल्पसंख्याक समुदायांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि समुदायाच्या मालकीच्या वक्फ मालमत्तेचा वापर प्रभावीपणे आणि न्याय्यपणे गरीब मुस्लिमांसाठी केला जाईल याची खात्री करण्यासाठी सरकारच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक आहे. अधिक पारदर्शकता, जबाबदारी आणि सार्वजनिक सहभागाची ओळख करून देऊन संपूर्ण भारतात वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन कसे केले जाते यामध्ये एक आदर्श बदल घडवून आणण्याची अपेक्षा आहे, असे केंद्रीय मंत्री रिजिजू यावेळी म्हणाले.
उमीद सेंट्रल पोर्टल हे युनिफाइड वक्फ मॅनेजमेंट, एम्पॉवरमेंट, एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट अॅक्ट, १९९५ चे संक्षिप्त रूप आहे. ते वक्फ मालमत्तेचे रिअल-टाइम अपलोडिंग, पडताळणी आणि देखरेख करण्यासाठी एक केंद्रीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून काम करणार आहे.
पोर्टलची प्रमुख वैशिष्ट्ये
· सर्व वक्फ मालमत्तांच्या जिओ-टॅगिंगसह डिजिटल इन्व्हेंटरी तयार करणे
· ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली
· पारदर्शक भाडेपट्टा आणि वापर ट्रॅकिंग
· जीआयएस मॅपिंग आणि इतर ई-गव्हर्नन्स साधनांसह एकत्रीकरण
· सत्यापित रेकॉर्ड आणि अहवाल जनतेसाठी खुले