अवैध गौण खनिज उत्खननावर आता असणार ड्रोनचा वॉच - मंत्री बावनकुळे यांचा निर्णय

- खाणपट्ट्यांच्या सर्वेक्षणासाठी लवकरच निविदा प्रक्रिया

    06-Jun-2025
Total Views |

Drones will now be deployed to monitor illegal minor mineral extraction - Minister Bawankule decision
 
मुंबई: राज्यातील अवैध गौण खनिज उत्खननाला चाप लावण्यासाठी ड्रोनद्वारे खाणपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
 
येत्या तीन महिन्यांत राज्यातील सर्व खाणपट्ट्यांची मोजणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे अवैध खननाला आळा घालण्याबरोबरच कृत्रिम वाळू निर्मिती प्रकल्पाला गती मिळणार आहे. सर्वेक्षणातून मिळणारी माहिती प्रत्येक तीन महिन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावी लागेल आणि ती तातडीने ‘महाखनिज’ संकेतस्थळावर अपलोड केली जाईल.
 
पुणे येथील गौण खनिज खाणपट्ट्यांच्या ड्रोनद्वारे मोजणीबाबत महसूल मंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे खाणपट्ट्यांचे अचूक सर्वेक्षण करण्यावर चर्चा झाली. पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या जमीन मोजणीत अनेक त्रुटी राहतात, ज्यामुळे अवैध खननाला आळा घालण्यात अडथळे येतात. यावर तोडगा म्हणून प्रायोगिक तत्त्वावर ड्रोनद्वारे केलेल्या सर्वेक्षणात उल्लेखनीय अचूकता आढळली आहे.
 
या यशस्वी चाचणीनंतर, गौण खनिज उत्खनन होणाऱ्या सर्व खाणींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मोजणी पद्धती निश्चित करणे, सर्वंकष निकष तयार करणे, खर्चाची तरतूद करणे आणि पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवणे यावर भर देण्यात येणार आहे.
 
ड्रोन सर्वेक्षणाचे फायदे
 
- ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण केल्यास खाणपट्ट्यांमधील पूर्वीचे खोदकाम, चालू खोदकाम, भविष्यातील खोदकामाची शक्यता आणि उपलब्ध दगड खाणींची सविस्तर माहिती मिळेल.
 
- अवैध खननावर नियंत्रण ठेवणे सोपे होईल.
 
- कृत्रिम वाळू निर्मिती प्रकल्पासारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना मिळेल.
 
दगड, मुरूम आणि वाळू यांसारख्या गौण खनिजांचे उत्खनन आणि रॉयल्टी संकलनावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर हा एक क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे. खनिज व्यवस्थापनात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल.
 
चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री