ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
06-Jun-2025
Total Views |
गडचिरोली : राज्यभरात सध्या ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असून आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शुक्रवार, ६ जून रोजी त्यांनी गडचिरोली येथे माध्यमांशी संवाद साधला.
उबाठा गट आणि मनसेच्या यूतीबद्दल उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर राज ठाकरे प्रतिक्रिया देतील. त्यात माझा काय संबंध? आता तरी यावर मी प्रतिक्रिया देण्याजोगे काही आहे असे मला वाटत नाही. मी माझा राजकीय अनुभव वारंवार सांगत नाही. तो योग्यवेळी सांगतो," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "गडचिरोलीमध्ये १२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. ही अत्यंत महत्वाची घटना आहे. १ कोटी रुपयांपेक्षा जास्त बक्षीस असलेले माओवाद्यांचे आत्मसमर्पण हेच इंगित करते की, आता माओवादाची कंबर मोडलेली आहे. ज्या गोष्टीकरिता ते हिंसा करत होते ते मृगजळ होते हे त्यांच्या लक्षात आले असून आता त्यांनी पुन्हा भारताच्या संविधानावर पूर्ण विश्वास दाखवत मुख्य धारेत येण्याचा निर्णय घेतला आहे. मी त्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज पहिल्यांदाच पूर्ण गणवेशात आणि शस्त्रासहित आत्मसमर्पण होताना आपण बघितले. यातून उरलेल्या माओवाद्यांना तुम्हीसुद्धा आत्मसमर्पण करा. आत्मसमर्पण केल्यास तुमचेही जीवन चांगले होईल. अन्यथा त्यांना आवश्यकतेप्रमाणे अटक केले जाईल, हा एकच संदेश यातून जातो," असे ते म्हणाले.
१३ आत्मसमर्पित माओवादी जोडप्यांचा विवाह संपन्न!
"समर्पित माओवादी असलेल्या १३ जोडप्यांचे आज लग्न झाले. जंगलात हत्यारे घेऊन संघर्ष करणारे आता वैवाहिक जीवनात अडकून आपले नवीन जीवन सुरु करत आहेत, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पुनर्वसन केवळ आपल्या भाषणापुरते नाही तर सर्वार्थाने आपण पुनर्वसन करतो आहोत, हे यातून इंगित होत आहे. या तेराही जोडप्यांचे वैवाहिक जीवन सुख समाधानाचे आणि आरोग्य ऐश्वर्याचे जावे," अशी प्रार्थनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.