ईशान्य भारतात पूरस्थिती कायम, आसाममधील सहा लाखांहून अधिक नागरिक बेघर

    05-Jun-2025   
Total Views |

northeast floods worsen; assam, arunachal among worst hit
गुवाहाटी : (Northeast floods worsen) आसामसह ईशान्येकडील इतर राज्यांमध्ये पूरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आसाममधील पूरस्थितीही दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएम) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २१ जिल्ह्यांतील ६.३ लाख नागरिक पुरामुळे बेघर झाले आहेत.
 
संततधार पाऊस आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे आसाममधील मोरीगाव आणि दरंग जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसल्याचे सांगण्यात आले. श्रीभूमी जिल्ह्यातील २.३१ लाख लोक बेघर झाले आहेत.अरुणाचल प्रदेशात सततच्या पावसामुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये एकूण १२ जणांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे २३ जिल्ह्यांमधील ३,००० हून अधिक नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे.
 
उत्तर सिक्कीम, मंगन, लाचेन आणि चाटेनमध्ये भूस्खलन झाले असून अनेक पर्यटक अडकले आहेत. मेघालय, मणिपूरमध्येही परिस्थिती बिकट असून अनेक नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारे आणि केंद्र सरकार पूरग्रस्तांना मदत पोहोचविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\