नेटफ्लिक्स ग्लोबल टॉप १०मध्ये भारतीय कलाकृतींची धमाल; 'द रॉयल्स' सलग चौथ्या आठवड्यात यादीत कायम!

05 Jun 2025 13:35:01

indian works make a splash in netflix global top 10


मुंबई : नेटफ्लिक्सवर जागतिक पातळीवर टॉप १० नॉन-इंग्रजी कंटेंटच्या यादीत यंदा भारताच्या चार कलाकृतींनी स्थान पटकावले आहे. यात एक हिंदी सिरीज, एक हिंदी चित्रपट, एक तेलुगू आणि एक तमिळ चित्रपट यांचा समावेश आहे. यामधील द रॉयल्स ही वेब सिरीज सलग चौथ्या आठवड्यात ग्लोबल टॉप १० यादीत झळकली आहे. तर सलमान खानचा सिकंदर, कार्तिक सुब्बाराज दिग्दर्शित रेट्रो आणि तेलुगू हिट सिरीजचा पुढील भाग हीट : द थर्ड केस या तिघांनी यादीत नवीन एन्ट्री केली आहे.

द रॉयल्स
इशान खट्टर आणि भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेली द रॉयल्स सध्या नेटफ्लिक्सवर मोठ्या प्रमाणात पाहिली जात आहे. ९ मे रोजी प्रदर्शित झाल्यानंतर सलग दोन आठवडे या सिरीजने तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं होतं. यंदाच्या आठवड्यात ती सहाव्या क्रमांकावर आहे. चौथ्या आठवड्यात तिला तब्बल १.४ दशलक्ष व्ह्यूज मिळाले असून ८.६ दशलक्ष तासांचा वॉचटाईम नोंदवला गेला.

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशात ही सध्या सर्वाधिक पाहिली जाणारी वेब सिरीज आहे. या आधुनिक राजेशाहीवर आधारित कथेत इशान खट्टर एका थंड डोक्याच्या राजपुत्राच्या भूमिकेत आहे, तर भूमी पेडणेकर एका दूरदृष्टी असलेल्या स्त्रीच्या भूमिकेत आहे जी जुन्या वाड्यांना व्यवसायात बदलायची कल्पना घेऊन आलेली असते. झीनत अमान, साक्षी तन्वर, डिनो मोरेया, मिलिंद सोमण, चंकी पांडे, नोरा फतेही आणि सुमुखी सुरेश यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सिकंदर
सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट २५ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि पहिल्याच आठवड्यात तो ग्लोबल नॉन-इंग्रजी यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. या चित्रपटाने ५.१ दशलक्ष व्ह्यूज आणि ११.४ दशलक्ष वॉचटाईम मिळवला. भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, नायजेरिया, बहारिन, मलेशिया, युएई यासारख्या ९ देशांमध्ये हा सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला.

ए.आर. मुरुगादॉस दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खानने एका माजी राजाच्या भूमिकेतून सामाजिक भान जपणाऱ्या पतीची भूमिका साकारली आहे. यात रश्मिका मंदाना, सत्यराज, प्रतीक, काजल अग्रवाल, शर्मन जोशी आणि अंजिनी धवन यांच्या भूमिका आहेत. नाडियाडवाला ग्रँडसन आणि सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार झाला आहे.

हीट : द थर्ड केस 
२९ मे रोजी नेटफ्लिक्सवर आलेला हा तेलुगू थ्रिलर हीट : द थर्ड केस या आठवड्यात चौथ्या क्रमांकावर राहिला. ४.२ दशलक्ष व्ह्यूज आणि १०.८ दशलक्ष तास वॉचटाईमसह या चित्रपटाने जोरदार एन्ट्री केली. शैलेश कोलानू दिग्दर्शित या चित्रपटात नानी आणि श्रीनिधी शेट्टी यांनी मुख्य भूमिका साकारली असून एका खुनाचा तपास लावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची ही कथा आहे.

रेट्रो
कार्तिक सुब्बाराज दिग्दर्शित Retro या तमिळ चित्रपटाने ३१ मे रोजी नेटफ्लिक्सवर पदार्पण केलं आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांत २.५ दशलक्ष व्ह्यूज मिळवत सातव्या क्रमांकावर झळकला. या रोमँटिक अ‍ॅक्शन फिल्ममध्ये सूर्या आणि पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रेक्षकांनी चित्रपटाची प्रशंसा केली असून थिएटरमध्येही या चित्रपटाने चांगली कमाई केली होती.



Powered By Sangraha 9.0