"मी निःशब्द झालोय..." RCB च्या विजयोत्सवातील चेंगराचेंगरीच्या घटनेवर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया
05 Jun 2025 13:01:34
मुंबई : (Virat Kohli reacts to Bengaluru stadium stampede) यंदाच्या आयपीएल विजेत्या 'रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु' संघाच्या विजयाच्या आनंदाला चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे गालबोट लागले. जेतेपदाच्या जल्लोषावेळी खेळाडूंच्या स्वागतासाठी स्टेडियम गेटवर चाहत्यांची तुफान गर्दी जमली होती. या गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर विराट कोहली याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
विराट कोहलीने आरसीबी संघाच्या टीमने अधिकृत निवेदनासह स्वतःच्या भावना पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत. “मी निःशब्द झालोय... मी पूर्णपणे अस्वस्थ आहे." असे त्याने म्हटले आहे. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रवेश मिळवण्याच्या प्रयत्नात हा दुर्देवी प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
आरसीबी संघाच्या टीमने देखील याबाबत शोक व्यक्त करत एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. “दुर्घटनेबद्दल आम्हाला माध्यमांद्वारे माहिती मिळाली. या घटनेमुळे आम्हाला अत्यंत दु:ख झाले आहे. आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये तात्काळ बदल केला असून, प्रशासनाच्या सूचना आणि सल्ल्याचे पालन केले आहे. आमच्या सर्व चाहत्यांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करतो,” असं आरसीबीने स्पष्ट केले आहे.