‘व्याघ्र’ देशाचे पर्यटन

    05-Jun-2025
Total Views |
Tiger Tourism in the country

राज्यात वाघांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर व्याघ्र पर्यटनाच्या संधी आणि त्याचे स्वरुप कशा पद्धतीचे असावे, याविषयी विवेचन करणारा हा लेख...


भारतासारख्या जैवविविधतेने समृद्ध देशात वाघ हा केवळ इथल्या जंगलांवर राज्य करत नाही, तर तो आपल्या भारतभूमीच्या अस्तिवाचे प्रतीक आहे. भारतीय उपखंडातील वाघ ‘पँथेरा टायग्रेस’ म्हणून ओळखला जातो. रणथंबोरच्या वाळवंटी प्रदेशात फिरणारा, कान्हाच्या खड्या सालाच्या जंगलात गर्जणारा, ताडोबाच्या बांबूच्या बेटांमध्ये मुक्त संचारणारा आणि सुंदरबनच्या पाणथळीत वास्तव्य करणारा भारतीय वाघ त्याच्या या अनेक रूपांनी आपल्याला भुरळ घालतो. तो इथल्या परिसंस्थेचा एक अविभाज्य घटक आहे. 1973 मध्ये सुरू झालेल्या ’प्रोजेक्ट टायगर’मुळे भारतातील वाघांचे संरक्षण अधिक ठोसपणे हाती घेण्यात आले. पुढे गेल्या काही दशकांत व्याघ्र पर्यटनाच्या संकल्पनेने लोकप्रियता मिळवली. राजस्थानमधील रणथंबोर, मध्य प्रदेशातील कान्हा, बांधवगड, महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि कर्नाटकमधील नागरहोल, बंदिपूर अशी अनेक ठिकाणे पर्यटकांसाठी व्याघ्रदर्शनाची महत्त्वाची केंद्रे ठरली. पर्यटनाचे अर्थकारण, स्थानिक लोकांची उपजीविका आणि पर्यावरणाचे संवर्धन या तिन्हीचे एकत्रित गणित व्याघ्र पर्यटनामागे दडलेले आहे.

आज भारतीय वाघांची संख्या समाधानकारक असली, तरी त्यांच्या संरक्षणासाठी चिरंतन प्रयत्न आवश्यक आहेत. व्याघ्र पर्यटनातून मिळणार्‍या उत्पन्नाचा वापर जंगल संरक्षण, अ‍ॅण्टी-पोचिंग पथके आणि स्थानिक समुदायांच्या विकासासाठी होणे अपेक्षित आहे. पारदर्शक निधी व्यवस्थापन आणि विनियोग महत्त्वाचे आव्हान आहे. वाढत्या पर्यटनामुळे जंगलांमध्ये वाहनांची गर्दी, प्लास्टिकचा कचरा आणि आवाजाचे प्रदूषण वाढले आहे, ज्यामुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवासावर ताण येतो. उदाहरणार्थ, सफारी वाहनांच्या वाढत्या उपस्थितीमुळे, रात्रीच्या सफारीमध्ये वाघ बघायला कृत्रिम प्रकाशाच्या वापरामुळे वाघांच्या वर्तनात बदल दिसून येतो. त्यांच्या शिकारीच्या पद्धती, प्रजनन आणि क्षेत्रीय हालचालींवर परिणाम होतो. त्यासाठी डोळस पर्यटनाची गरज आहे.

व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यटन किंवा संवर्धनाच्या नावाखाली वाघांना कृत्रिमरित्या संरक्षित केल्यास मानवी-वाघ संघर्ष वाढतो. कारण, अशा संरक्षित अधिवासांमध्ये वाघांच्या नैसर्गिक वर्तनावर ताण येतो आणि त्याला जबाबदार सर्वस्वी आपण असतो.

काही व्याघ्र प्रकल्पांमध्ये व्हिआयपी पर्यटकांना प्राधान्य देण्यात येते. त्यामुळे पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवले जातात. ठराविक वाहनांच्या संख्येपेक्षा जास्तीची वाहने दुप्पट, तिप्पट पैसे आकारून सोडली जातात. वाघासमोर गाड्यांची रांगच रांग लागते. फोटोग्राफरना त्यांचे फोटो लाखोंच्या किमतीने विकता यावेत आणि त्यासाठी विशेष सवलती दिल्या जातात. त्यामुळे साहजिक इथल्या प्राण्यांच्या बरोबरीने प्रशासनावरचा ताण वाढतो. या सगळ्यावर व्याघ्र पर्यटन बंद करणे, हा उपाय मात्र नक्कीच नाही. पण, त्यासाठी पूरक सरकारी धोरण आणि सजग पर्यटन आवश्यक आहे.

जंगल परिसरातील शाळांमध्ये ‘वन्यजीव शिक्षण’ अनिवार्य करून पुढील पिढीला पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून द्यावे. पर्यटन क्षेत्रातील गाईड, वाहनचालक, लॉज कर्मचारी यांना पर्यावरण शिक्षण आणि वाघांच्या नैसर्गिक अधिवासाची महत्त्वाची माहिती देणे, त्यांना सातत्याने ट्रेनिंग देणे, ’छे झश्ररीींळल उरारिळसप’सारखे अभियान चालवणे अत्यावश्यक आहे. ताडोबासारख्या काही व्याघ्र प्रकल्पांनी ’झिरो प्लास्टिक’सारखे नियम लागू करून त्याची सुरुवातही केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्याघ्र पर्यटनाचा प्रचार आणि प्रसार केल्यास, परदेशी पर्यटक आकर्षित होतील आणि त्यामुळे व्याघ्र पर्यटनातून होणारे उत्पन्न वाढेल. पर्यटनामुळे होणार्‍या पर्यावरणीय परिणामांचा आणि वाघांच्या हालचाली, अधिवास आणि मानवी हस्तक्षेपाचा अभ्यास सातत्याने अभ्यास करण्यासाठी डेटा जमा करणे आणि त्यावर संशोधन करणे गरजेचे आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या एकूण क्षेत्राच्या फक्त 20 टक्के फक्त पर्यटनासाठी खुला असतो बाकी भाग वनविभागाच्या निगराणीत असतो. वर्षानुवर्षे फक्त तोच भाग पर्यटकांसाठी खुला ठेवण्यापेक्षा दर दोन वर्षांनी किंवा पाच वर्षांनी वेगळा 20 टक्के भाग खुला केला जावा. काही क्षेत्रे रोटेशन पद्धतीने काही दिवस ’नो-टूरिस्ट’ झोन म्हणून ठेवून जंगलाला विश्रांती द्यावी. वर्षाचे आठ महिने पर्यटन चालते. त्यात फिरणार्‍या गाड्यांमुळे तिथल्या भागावर आणि पर्यायाने वाघांवर लक्ष आपोआप ठेवले जाते, पोर्चिंगची शक्यता दुरापास्त होते. त्याने वनविभागाला मदतच होते.
पर्यटकांना जंगलाचा अनुभव हवा आहे. तो त्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही मिळत राहावा. यासाठी जंगल, प्राणी आणि पर्यावरण टिकवून ठेवण्याच्या प्रक्रियेत पर्यटनाचा सकारात्मक वाटा असावा, अशी अपेक्षा आहे. आपण जंगलात वाघ पाहायला जातो, पण प्रत्यक्षात आपल्याला आपली संस्कृती, आपली नैतिकता, आपली जबाबदारी आणि निसर्गाशी असलेलं नातं पुन्हा शोधायचं असतं. त्यामुळे व्याघ्र पर्यटन हे आपले निव्वळ आकर्षण नाही, तर जबाबदारी आहे. आज जागतिक पर्यावरण दिन साजरा करत असताना ही जबाबदारी आपण प्रत्येकाने घेऊया.

अक्षता बापट
(लेखिका व्याघ्र पर्यटनाचे दौरे आयोजित करतात.)